साधकांच्या मनात भावाचे बीज फुलवणारा आणि ईश्वरप्राप्तीच्या वाटेवरील दीपस्तंभ असलेला भाववृद्धी सत्संग !
‘३.१.२०१९ या दिवशी राष्ट्रीय स्तरावरील भाववृद्धी सत्संगांची शतकपूर्ती झाली, म्हणजे १०० भाववृद्धी सत्संग पूर्ण झाले. या भाववृद्धी सत्संगाचा लाभ करून घेऊन सर्वत्रच्या साधकांमध्ये आंतरिक परिवर्तन झाले. भाववृद्धी सत्संगामुळे आपल्या जीवनाला कलाटणी मिळून आपले जीवन आनंदमय झाल्याची अनुभूती आपण घेत आहोत. सत्संगात झालेले सर्व विषय, म्हणजे साक्षात् ब्रह्मदेवाचे ज्ञानच असून ते आपल्याला मिळत आहे.
राष्ट्रीय स्तरावरील भाववृद्धी सत्संगाचा मूळ स्रोत वैकुंठलोक आहे. साक्षात् वैकुंठलोकातूनच श्रीविष्णूच्या चरणी हा भावसत्संग घेतला जातो. भाववृद्धी सत्संगाच्या माध्यमातून साधक भगवंताचा कृपावर्षावही अखंड अनुभवत आहेत. ती कृपा साधकांनी सत्संगात सांगितलेल्या प्रयत्नांच्या माध्यमातून कशी अनुभवली ? याविषयी त्यांनी भावसत्संगामध्ये कृतज्ञतास्वरूपात अर्पण केलेले शब्दरूपी मनोगत येथे दिले आहे.
२४ नोव्हेंबर २०२२ या दिवशी आपण काही साधकांचे मनोगत पाहिले. आज त्यापुढील भाग पाहूया.
१४. सौ. सिमंतीनी बोर्डे, संभाजीनगर
१४ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना तळमळीने प्रार्थना केल्यावर पूर्वजांविषयी असलेले पूर्वग्रह दूर होऊन मनात त्यांच्याविषयी आदर आणि प्रेमभाव निर्माण होणे
१४ अ १. दिवंगत सासूबाईंविषयी असलेला पूर्वग्रह आणि प्रतिक्रिया नष्ट होणे : ‘माझ्या मनात दिवंगत सासूबाईंविषयी तीव्र पूर्वग्रह होता आणि त्यांच्याविषयी प्रतिक्रियाही येत असत. सकाळी स्वयंपाकघरात कामे करतांना पूर्वीचे प्रसंग आठवून मी त्यात वाहून जायचे. १ – २ घंट्यांनी मला त्याची जाणीव होऊन पश्चात्ताप होत असे. एका भावसत्संगात सांगितले, ‘‘आपल्यात असलेले पूर्वग्रह आणि प्रतिक्रिया जाण्यासाठी प.पू. गुरुमाऊलीचा (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा) संकल्प झाला आहे.’’ भावसत्संग संपल्यानंतर मी लगेच गुरुमाऊलीला शरण जाऊन अत्यंत तळमळीने प्रार्थना केली, ‘दिवंगत सासूबाईंविषयी आणि अन्य नातेवाइकांविषयी माझ्या मनात असलेले पूर्वग्रह अन् प्रतिक्रिया नष्ट होऊ देत.’ त्यानंतर मी स्वयंसूचनेचे सत्र केले. दुसर्या दिवशी स्वयंपाक करतांना सासूबाईंविषयी अजिबात पूर्वग्रह किंवा प्रतिक्रिया आल्या नाहीत. त्यानंतरही एखादा जुना प्रसंग मनात येता क्षणीच मला त्याच्यावर मात करता येऊ लागली.
१४ अ २. पूर्वजांना प्रार्थना करून त्यांना ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करण्यास सांगणे, त्यानंतर पूर्वजांविषयी असलेला पूर्वग्रह जाऊन त्यांच्याविषयी मनात आदर आणि प्रेमभाव निर्माण होणे : मी स्नान करतांना पूर्वेला सूर्यनारायणाला, दक्षिणेला पितरांना आणि उत्तरेला ऋषिमुनींना अर्घ्य देते. काही दिवसांपूर्वी मी दक्षिण दिशेला अर्घ्य देऊन पूर्वजांना प्रार्थना केली, ‘तुम्ही जेथे असाल, तेथे ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करा आणि ‘माझ्याकडून झालेल्या चुकांसाठी मला क्षमा करा.’ मी त्यांची क्षमायाचना केली, तेव्हा ‘दिवंगत सासूबाई माझ्याकडे हसत पहात आहेत’, असे मला दिसले. तेव्हा माझा गुरुमाऊलीविषयी कृतज्ञताभाव दाटून आला. आता माझ्या मनातील सासूबाईंविषयीचा पूर्वग्रह जाऊन माझ्या मनात त्यांच्याविषयी आदर आणि प्रेमभाव निर्माण झाला आहे. प.पू. गुरुमाऊलीच्या कृपेने अन्य नातेवाइकांविषयी माझ्या मनात येणार्या प्रतिक्रियाही न्यून झाल्या आहेत.’
१५. सौ. वैशाली जाधव, सातारा
१५ अ. भावसत्संग ऐकल्यापासून प्रार्थना होऊ लागून प्रत्येक कृतीला भावाची जोड देता येणे : ‘आधी माझ्याकडून कुठल्याही गोष्टीसाठी प्रार्थना होत नव्हत्या. भावसत्संग ऐकल्यापासून माझ्याकडून प्रत्येक गोष्टीसाठी प्रार्थना होऊ लागल्या. प्रत्येक गोष्टीत गुरुदेव माझी काळजी घेत होते. आता स्वयंसूचना सत्र केल्याने हळूहळू माझ्यात पालट होत गेले. मी प्रत्येक कृतीला भावाची जोड द्यायला लागले.
१५ आ. भावसत्संग ऐकल्यापासून स्वभावदोष उणावून इतरांना समजून घेता येऊ लागणे : माझ्या मनात मुलांविषयी प्रतिक्रिया येत होत्या; परंतु आता मला त्यांना समजून घेता येऊ लागले आहे. माझ्या यजमानांना नामजप करतांना कधी कधी झोप येत असे. मी त्यांना प्रार्थना करायला सांगितली. त्यामुळे आता त्यांना नामजप करतांना झोप येत नाही. त्यांचा नामजप भावपूर्ण होऊ लागला आहे. मी सहसाधकांकडून नवीन गोष्टींची माहिती करून घेऊ लागले आहे. माझ्याकडून झालेल्या चुका मी लिहायला आरंभ केल्यामुळे माझ्या चुका माझ्या लक्षात येऊ लागल्या आहेत. त्यामुळे माझे स्वभावदोष अल्प होऊन माझ्यातील नकारात्मक विचारांचे प्रमाण उणावले आहे.’
१६. सौ. विमल गरुड, सनातन आश्रम, देवद, पनवेल.
१६ अ. ‘कितीही स्वभावदोष आणि आध्यात्मिक त्रास असला, तरी गुरुमाऊलीच्या कृपेने ते घालवणे शक्य आहे’, असे अनुभवणे : ‘माझ्यामध्ये रागीटपणा, चिडचिडेपणा, ऐकून न घेणे, स्वतःच्या मतावर ठाम असणे, तीव्र अपेक्षा करणे, प्रतिक्रिया देणे, नकारात्मक विचारात रहाणे, असे अनेक स्वभावदोष होते. प.पू. गुरुदेवांच्या कृपेमुळे मला भावसत्संगाचा लाभ झाला आणि माझ्या जीवनाला कलाटणी मिळाली. ‘प.पू. गुरुदेवांनी माझ्यासाठी किती केले आहे ?’, याविषयी चिंतन केल्यावर मला पुष्कळ कृतज्ञता वाटली. ‘कितीही स्वभावदोष आणि आध्यात्मिक त्रास असला, तरी गुरुमाऊलीच्या कृपेने ते घालवणे शक्य आहे’, असे मला अनुभवता आले. त्यामुळे माझ्यातील कृतज्ञताभावात वाढ झाली.
१६ आ. कुटुंबियाकडून ‘अपेक्षा करणे’ हा स्वभावदोष उणावणे : भावसत्संगामुळे ‘साधनेच्या दृष्टीने कुटुंबाकडे कसे पहायचे ?’, याची मला दिशा मिळाली. त्यामुळे माझे कुटुंबियांशी मनमोकळेपणाने बोलणे, कुटुंबियांचे गुण पहाणे, ‘त्यांच्यामुळे साधना करू शकते’, यासाठी कृतज्ञ रहाणे’, हा भाग वाढला. त्यामुळे माझा अपेक्षेचा भाग अल्प झाला आणि प्रेमभावात वाढ झाली. ‘सर्व कृती देवच करवून घेत आहे’, हे आता मला अनुभवता येते.’
१७. कु. कुहू पांडे, अयोध्या
१७ अ. परिस्थिती स्वीकारता येणे आणि ‘प्रत्येक प्रसंग देवाच्या इच्छेनेच होतो’ यावर श्रद्धा वाढणे : ‘भावसत्संग ऐकल्यापासून माझ्यात पालट झाले; पण त्यासाठी माझ्याकडून विशेष प्रयत्न झाले नाहीत. जो काही पालट झाला आहे, तो आपोआपच झाला आहे. लहानपणापासून माझ्यात एक मोठा दोष होता, ‘मला अनुकूल नसेल’, अशी परिस्थिती माझ्याकडून कधीच स्वीकारली जात नाही. ‘माझ्या जीवनातील व्यक्तींनी माझ्या मनानुसार वागावे’, असे मला वाटायचे. भावसत्संग ऐकायला लागल्यापासून माझ्या मनात विश्वास आणि दृढ श्रद्धा निर्माण झाली की, ‘जो प्रसंग होत आहे, तो माझ्या मनाप्रमाणे होत नाही; कारण ‘ती परिस्थिती ही देवाचीच इच्छा आहे अन् ती परिस्थिती स्वीकारणे, म्हणजे देवाला स्वीकारणे आहे.’ प्रत्येक प्रसंग देवाच्या इच्छेनेच होतो आणि त्यात माझे चांगलेच होणार आहे. ‘देव त्यातून मला काहीतरी शिकवतच आहे. प्रत्येक क्षणी तो माझ्या समवेत आहे आणि काही झाले, तरी काळजी करायची नाही’, हे आता माझ्या लक्षात येते. माझी देवावर दृढ श्रद्धा निर्माण झाली आहे.
१७ आ. ‘सर्वकाही श्री गुरूंचेच आहे,’ हे लक्षात ठेवून काटकसर करणे : माझा दिवसातील बराच वेळ वाया जात होता. ‘मित्र-मैत्रिणींच्या समवेत फिरणे आणि पैसे उडवणे’, असे होत होते. ‘कोणतीही गोष्ट, वस्तू, पैसा हे आपले नाही, सर्वकाही श्री गुरूंचेच आहे’, हे सत्संगातील वाक्य माझ्या मनाला पटले. आता छोटीशी गोष्ट विकत घेतांना माझ्या मनात विचार येतो, ‘ही गोष्ट आवश्यक आहे का ? श्री गुरूंचे पैसे वाया जात नाहीत ना ?’ पूर्वी मी एकच वस्तू वेगवेगळ्या रंगात घेत होते. कितीही घेतले, तरी माझे समाधान होत नव्हते. वस्तूंचा संग्रह करणे आणि मायेत रमणे, असे माझ्याकडून होत होते. भावसत्संगाने हे स्वभावदोष अल्प झाले.
१८. अश्विनी कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
१८ अ. स्वभावदोष उणावून भावाच्या स्तरावर प्रयत्न करता येणे : ‘पूर्वी माझ्यामधे ‘मी श्रेष्ठ आहे, मला फार कळते, मनाने करणे, स्वीकारण्याची वृत्ती नसणे, तीव्र कर्तेपणा इत्यादी अहंचे पैलू होते. भावसत्संगात सांगितलेले दृष्टीकोन माझ्या स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेला पूरक झाले. ‘चुका स्वीकारणे, चुका सांगणे आणि क्षमायाचना करणे’ यातील आनंद मला घेता येऊ लागला. मी स्वतःच्या कोषातून बाहेर पडले. माझ्यात मोकळेपणा आला. पूर्वी माझ्यात प्रतिक्रियांचे प्रमाण जवळपास ८० टक्के होते. ते आता अत्यल्प झाले आहे. माझ्या स्वभावातील रागीटपणा न्यून झाला. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला भावाच्या स्तरावर प्रयत्न करता येऊ लागले. भाव व्यक्त करता येऊ लागला. आता मला ‘माझे अस्तित्वच नाही’, असे वाटायला लागले आहे.
१८ आ. प्रेमभाव वाढणे : पूर्वी मी इतरांना तोडून बोलायचे. माझ्या बोलण्यात रुक्षपणा आणि तुटकपणा असायचा. ते सर्व न्यून होऊन ‘माझ्यात प्रेमभाव वाढत आहे’, असे मला जाणवायला लागले. त्यामुळे या साधनेच्या प्रवासात मला आनंदाची अनुभूती घेता येऊ लागली आहे. आता बाहेरची परिस्थिती कशीही असली, कुठलाही प्रसंग असला, तरीही ‘मी आतून आनंदी आहे’, असे मला सतत जाणवते. ‘माझा प्रवास आता आनंदाच्या वाटेवरून सच्चिदानंदाच्या वाटेवर चालला आहे’, असे मला वाटते.
(१०.४.२०१९) (समाप्त)
‘भाववृद्धी सत्संगाच्या माध्यमातून सर्व साधकजिवांच्या अंतरात भावाचे बीज फुलवणार्या आणि आपल्या संकल्पशक्तीद्वारे साधकांकडून प्रयत्न करवून घेऊन सर्व साधकांना भावानंदात डुंबवणार्या परात्पर गुरुमाऊलीच्या चरणी आम्हा सर्व साधकांकडून अनंत कोटी कृतज्ञता !’ – संकलक कु. वैष्णवी वेसणेकर (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) आणि कु. योगिता पालन, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.४.२०१९) |
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |