एक्सप्रेस रेल्वेगाडीला ३ घंटे उशीर झाल्यास तिकिटाचे सर्व पैसे परत मिळणार !
नवी देहली – एक्स्प्रेस रेल्वेगाडीने प्रवास करतांना गाडीला ३ घंटे उशीर होत असेल, तर तिकिटाचे सर्व पैसे परत मिळणार आहेत. एवढेच नाही, तर अल्पाहार आणि जेवण हेही विनामूल्य मिळणार आहे, अशी घोषणा केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली आहे. ही तिकीट कन्फर्म, आर्.ए.सी. (रिझर्व्ह अॅगेन्स कॅन्सलेशन) किंवा ऑनलाईन काढलेली असली तरीही पूर्ण पैसे परत मिळणार आहेत. अल्पाहार आणि जेवण यांची सुविधा काही ठराविक रेल्वेमध्येच मिळणार आहे. रेल्वेला ३ घंटे किंवा त्याहून अधिक उशीर झाल्यास प्रवासी तिकीट रहित करू शकतात आणि संपूर्ण हानीभरपाई मिळवू शकतात, असे रेल्वेने म्हटले आहे.
तिकिटाचे पैसे परत कसे मिळणार?
जर तिकीट खिडकीवर रोख रक्कम भरून तिकीट खरेदी केले असेल, तर त्वरित रोख रक्कम मिळेल. जर तिकीट खिडकीवर तिकीट काढून डिजिटल स्वरूपात पैसे दिले असतील, तर पैसे ऑनलाईन मिळतील, अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.