नगरच्या नामांतरासाठी राज्य सरकारच्या हालचाली चालू
नगर – अहमदनगरचे नाव बदलून ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर’ करण्याची मागणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी विधान परिषदेत केली होती. या मागणीनंतर सरकारने नामांतराच्या हालचाली चालू केल्या आहेत. याविषयी जिल्हाधिकार्यांकडून नगर महानगरपालिकेच्या महासभेच्या ठरावाची प्रत मागवली आहे. राज्य सरकारने महापालिकेला पत्र पाठवून महासभेत नगरच्या नामांतराचा प्रस्ताव घेऊन बहुमताचा ठराव पाठवण्याचे आदेश दिले आहेत; मात्र यावरून स्थानिक नेत्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.
अहमदनगरचे नाव अंबिकानगर करण्याची मागणी शिवसेनेने याआधी केली होती, मात्र त्यानंतर आता पडळकर यांनी थेट विधिमंडळात याविषयी मागणी करून सरकारी भूमिका काय? असा तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. यावर बोलताना मंत्री दीपक केसरकर यांनी नगरच्या नामांतराविषयी सरकार सकारात्मक असल्याची माहिती दिली होती. याविषयी स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रस्तावही मागवले असल्याचे त्यांनी सांगितले होते.
भाजप आमदार राम शिंदे आणि महादेव जानकर यांनीही नगरच्या नामांतराच्या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधले होते. जून २०२१ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांनी पत्र लिहिले होते. त्यामध्ये त्यांनी नगरला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी केली होती. अहिल्याबाईंचा जन्म नगरमधल्या चौंडी गावात झाला, या कारणास्तव नगरचे नामांतर करावे असे पडळकर यांनी पत्रात नमूद केले होते.