शासकीय कामकाजात देवनागरी लिपीतील सुधारणांचा अवलंब करण्यास ६ मासांची मुदतवाढ !
मुंबई, ३ जानेवारी (वार्ता.) – शासकीय कामकाजात वापरण्यात येणार्या देवनागरी लिपीमध्ये करण्यात आलेल्या सुधारणा लागू करण्यासाठी शासनाकडून ६ मासांची मुदतवाढ देण्यात आली आहे. या सुधारणांमध्ये वर्णमालेतील १२ स्वरांमध्ये ‘ॲ’ आणि ‘ऑ’ या २ अधिक स्वरांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे स्वरांची संख्या १४ होणार आहे. यांसह शासकीय कामकाजात देठयुक्त ‘श’ आणि पाकळीयुक्त ‘ल’ यांचा स्वीकार करण्यात येणार आहे. याविषयी शासनाकडून १० नोव्हेंबर या दिवशी शासन आदेश काढण्यात आला आहे. सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था, विद्यापीठे, महामंडळे, प्राधिकरण, पाठ्यपुस्तके यांमध्ये हा आदेश लागू करण्यात येणार आहे.