‘धर्मांतर आणि लव्ह जिहाद’ यांविषयी प्रबोधन होणार असल्याने मेळाव्याला उपस्थित रहा ! – महंत जितेंद्र महाराज
गोद्री (जिल्हा जळगाव) येथे २५ जानेवारीपासून ‘अखिल भारतीय बंजारा महाकुंभ मेळाव्या’चे आयोजन !
वाशिम – जळगाव जिल्ह्यातील गोद्री येथे २५ ते ३० जानेवारी या कालावधीत ‘अखिल भारतीय बंजारा महाकुंभ मेळावा’ होणार आहे. धर्मांतर आणि लव्ह जिहाद यांसारखे प्रकार कुठे घडत आहेत, याविषयी मेळाव्याच्या माध्यमातून ते सरकारी दरबारी मांडता येतील. यासाठी मेळाव्याला सर्व बंजारा बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन धर्मपिठाचे महंत जितेंद्र महाराज यांनी केले आहे.
१. शिवबंधन बांधलेले महंत सुनील महाराज यांनी म्हटले आहे की, भाजप, संघ परिवार महामेळाव्याला प्रति पोहरादेवीच दर्जा देत आहे. यामुळे बंजारा समाजासाठी काशी असलेल्या पोहरादेवीचे महत्त्व अल्प करण्याचा डाव रचण्यात आला आहे. बंजारा समाजाची काशी ही पोहरादेवीच असून येथील महत्त्व अल्प करण्यासाठी भाजप-राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रयत्न करत आहेत. महामेळाव्यात बंजारा समाजातील लोकांनी जाऊ नये.
२. आयोजनात भाजप पक्षातील काही लोक असल्याने त्याचा लाभ भाजपला होणार असल्याचा समज चुकीचा आहे. धर्म संरक्षणासाठी बंजारा बांधवांनी एकत्र यावे’, असे आवाहन जितेंद्र महाराज यांनी केले.
३. बंजारा समाजाचे पोहरादेवीचे धर्मगुरु बाबूसिंग महाराज यांनी सांगितले की, हा मेळावा बंजारा समाजाचा आहे. आमच्याशी चर्चा करूनच या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यात पक्षाचे काहीही देणे घेणे नाही. बंजारा समाजातील सर्व बांधव यात सहभागी होतील.