रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या चंडीयागाच्या वेळी आलेल्या अनुभूती
१. अधिक मासामुळे नवरात्रोत्सव एक मास पुढे गेल्याने ‘आध्यात्मिक त्रास वाढणार’ असे वाटणे आणि आश्रमात चंडीयाग होणार असल्याचे कळल्यावर त्रास उणावणार असल्याचे वाटून कृतज्ञता वाटणे
‘नवरात्रीपूर्वी येणार्या पितृपक्षामुळे पृथ्वीवर वाईट शक्तींच्या त्रासांचे प्रमाण वाढलेले असते; परंतु नवरात्रीच्या ९ दिवसांत देवी पृथ्वीवर निर्माण झालेल्या रज-तमाशी सूक्ष्मातून युद्ध करून वाईट शक्तींना नष्ट करते. त्यानंतर आध्यात्मिक त्रासाची तीव्रता अल्प होते. यावर्षी अधिक मासामुळे नवरात्रोत्सव १ मास पुढे गेला होता त्यामुळे ‘पितृपक्षात वाढलेल्या रज-तमामुळे होणारा त्रास १ मास अधिक होणार’, असा विचार माझ्या मनात आला. तेव्हा ‘देवच यावर मार्ग काढणार आहे’, असा विचार माझ्या मनात आला. त्यानंतर ‘आश्रमात महर्षींच्या आज्ञेने चंडीयाग होणार आहे’, हे समजल्यावर ‘परात्पर गुरु डॉक्टर साधकांची किती काळजी घेतात !’ या विचाराने मला पुष्कळ कृतज्ञता वाटली. ‘यज्ञाच्या वेळी देवी सूक्ष्मातून युद्ध करून साधकांचा त्रास अल्प करणार आहे’, असे मला वाटले.
२. यज्ञाच्या वेळी आलेल्या अनुभूती
चंडीयागाच्या ठिकाणी नामजपाला बसल्यावर मला आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
२ अ. पहिला दिवस
२ अ १. यागाचा धूर संपूर्ण शरिरात गेल्याने उत्साह जाणवून मनातील निराशा अल्प होणे : मी नामजप करत होते. मला तीव्र आध्यात्मिक त्रास असून ‘तो अल्प होत नाही’; म्हणून मला निराशा आली होती. त्या वेळी यागाचा धूर माझ्या संपूर्ण शरिरात जाऊ लागला. त्यानंतर मला उत्साह जाणवून मनातील निराशा अल्प झाली.
२ आ. दुसरा दिवस
२ आ १. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी देवीला कुंकू, गजरा, बांगड्या आणि साडी अर्पण केल्यावर यज्ञकुंडाच्या ठिकाणी चंडीदेवीचे अस्तित्व जाणवणे : मी यागाच्या ठिकाणी नामजपाला बसले होते. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी देवीला कुंकू, गजरा, बांगड्या आणि साडी अर्पण केल्यावर ‘यज्ञकुंडाच्या ठिकाणी प्रत्यक्ष चंडीदेवीच आली आहे’, असे मला दिसले.
२ आ २. देवी पुष्कळ आनंदी दिसत होती आणि ती ‘सर्वांना आशीर्वाद देत आहे’, असे मला जाणवले. त्या वेळी मला पुष्कळ आनंद झाला.
२ आ ३. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ देवीची ओटी भरत असतांना ‘देवीच देवीची ओटी भरत आहे’, असे मला वाटले आणि मी श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांना सूक्ष्मातून वाकून नमस्कार केला. त्यानंतर मला पुष्कळ चांगले वाटले.
२ इ. तिसरा दिवस
१. मोदकांची आहुती अर्पण केली जात असतांना ‘देवी प्रत्येक मोदक ग्रहण करत आहे’, असे मला सूक्ष्मातून दिसले.
२. यागाच्या वेळी माझ्या अनाहतचक्रावर हलकेपणा जाणवला आणि त्यानंतर माझा नामजप भावपूर्ण झाला.
२ ई. चौथा दिवस
२ ई १. ‘देवीला भेटायला जायचे आहे’, असा विचार तीव्रतेने मनात येणे आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना पाहिल्यावर ‘देवीच आली आहे’, असे वाटणे : मी नामजप करून येत असतांना ‘देवीला भेटायला जायचे आहे’, असा विचार तीव्रतेने माझ्या मनात येत होता. देवीचा यज्ञ असल्यामुळे माझ्या मनात देवीप्रती भाव निर्माण झाला होता. त्यानंतर श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना समोरून येतांना पाहिल्यावर मला ‘देवीच आली आहे’, असे वाटले. त्या माझ्याशी बोलून पुढे गेल्या आणि मी यज्ञाला गेले.
२ ई २. यज्ञाच्या ठिकाणी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना पाहिल्यावर जाणवलेली सूत्रे
अ. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांना यज्ञाच्या ठिकाणी पाहून ‘प्रत्यक्ष देवीच यज्ञाला आली आहे’, असे मला वाटत होते.
आ. मला ‘यज्ञाच्या ठिकाणी देवीलोक अवतरला आहे’, असे जाणवले.
इ. मी लहानपणी देवीच्या चित्रासमोर उभे राहून स्तोत्र म्हणत असे. तेव्हा माझ्या मनात ‘प्रत्यक्ष देवीचे दर्शन घ्यायचे आहे’, असा विचार अनेक वेळा येत असे. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांना पाहिल्यावर ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी माझी ती इच्छा पूर्ण केली’, असे मला वाटले.’
– कु. कल्याणी गांगण, (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के (आताची)) सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
|