विकलांग असूनही कुटुंबियांची काळजी घेणारे सनातनचे ९६ वे संत पू. संकेत गुरुदास कुलकर्णी (वय ३३ वर्षे) !
‘उद्या पौष शुक्ल चतुर्दशी (५.१.२०२३) या दिवशी पू. संकेत कुलकर्णी यांचा ३३ वा वाढदिवस आहे. या निमित्ताने मला (आई सौ. सुजाता कुलकर्णी यांना) त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि ते साधनेत मला करत असलेले साहाय्य, याविषयीची सूत्रे खाली दिली आहेत.
पू. संकेत गुरुदास कुलकर्णी यांना ३३ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
१. कामासाठी बाहेर जातांना पू. संकेतदादांना घरी दूरदर्शनवरील कार्यक्रम बघायला सांगितले, तर ते दूरदर्शन न पहाता आपल्याच विश्वात रममाण असल्याचे लक्षात येणे
पू. संकेतदादा विकलांग असल्यामुळे पूर्वी काही कामानिमित्त आम्हा दोघांना (मी आणि माझे यजमान यांना) कुठे बाहेर जायचे असेल, तर पू. संकेतदादा यांना न सांगता किंवा त्यांच्या झोपेच्या वेळा पाहून आम्हाला जावे लागत असे. कधी कधी आम्ही त्यांना दूरदर्शनवरील कार्यक्रम बघायला सांगत असू; परंतु ‘पू. दादा दूरदर्शनकडे पाठ करून बसतात आणि ते आपल्याच विश्वात रममाण असतात’, असे आमच्या लक्षात आले.
२. पू. दादांनी सेवेसाठी बाहेर जातांना काही अडचण निर्माण केली, तर सेवेत पुष्कळ अडथळे येणे
ते आम्हाला कधी कधी ठरलेल्या वेळेत जाण्यास अडचणी आणत असत, तरीही आम्ही गेलोच, तर आमच्या सेवेत पुष्कळ अडथळे यायचे, उदा. वाहनामध्ये बिघाड होणे, अपेक्षित व्यक्ती न भेटणे, चिडचिड होणे इत्यादी.
३. पू. संकेतदादांकडून शिकायला मिळालेली सूत्रे
जेव्हा आम्ही त्यांना एखादा प्रसंग सांगतो, तेव्हा ते शांतपणे ऐकून घेतात. एखाद्याला धीर देणे, साधकांविषयी त्यांच्यामागे न बोलणे, शांत आणि स्थिर रहाणे अन् मनाविरुद्ध लढणे, या गोष्टी मला त्यांच्याकडून शिकायला मिळाल्या.
४. पू. संकेतदादांमध्ये जाणवलेले पालट
अ. पू. दादांनी स्वतःमध्ये अनेक पालट केले आहेत. ‘त्यांना आवडणारे पदार्थ, जसे ‘बिस्किट’, ‘बेकरी प्रॉडक्ट’, त्यांच्या प्रकृतीला हानीकारक आहेत’, हे समजल्यावर त्यांनी ते खाणे अल्प केले.
आ. पूर्वी पू. संकेतदादांना कुठे बाहेर घेऊन जाणे फार त्रासाचे व्हायचे. अलीकडे कुठे जायचे असेल, तर आम्ही त्यांना जे सांगतो, तसेच ते कृतीत आणतात.
५. अनुभूती
५ अ. पू. संकेतदादांना सेवेसाठी बाहेर जात असल्याचे सांगितल्यावर आणि प्रार्थना केल्यावर सेवा अल्प कालावधीत पूर्ण होणे : पू. दादा संत झाले, तेव्हापासून आम्ही दोघेही त्यांना ‘आम्ही जात असल्याचे ठिकाण, आमच्या येण्याची वेळ सांगून जातो आणि ‘आमची सेवा चांगली होऊ दे’, अशी प्रार्थना करून जातो. पू. दादांना असे सांगून जायला आरंभ केल्यानंतर आमची सेवा अल्प कालावधीत पूर्ण होते.
५ आ. पू. संकेतदादांना सेवेसाठी बाहेर जात असल्याचे सांगितल्यावर आमची आपोआपच भावजागृती होणे : आम्ही त्यांना सर्व गोष्टी सांगायला आरंभ केल्यापासून आमची पू. संकेतदादांच्या प्रती आपोआपच भावजागृती होऊ लागली. अशा प्रकारे त्यांचे आम्हाला साधनेत साहाय्य होऊ लागले आणि आम्हाला त्यांच्या संतत्वाची प्रचीती येऊ लागली.
५ इ. पू. संकेतदादांच्या काकांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण (‘शूगर’) अकस्मात् वाढल्यावर त्यांना प्रार्थना करणे आणि दुसर्याच दिवशी त्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण उणावणे : ‘दोन मासांपूर्वी आम्हाला एका नातेवाइकाचा भ्रमणभाष आला. ते म्हणाले, ‘‘पू. दादांच्या काकांची रक्तातील साखरेचे प्रमाण अकस्मात् ७०० पर्यंत वाढले आहे.’’ तेव्हा मला भीती आणि काळजी वाटू लागली. काकांना पहाणारे अन्य कुणीच नाही. त्यामुळे त्यांची काळजी घेणे आणि पू. दादांची सेवा करणे आम्हाला कठीण वाटल्याने मी न रहावून पू. संकेतदादांना म्हणाले, ‘‘पू. दादा, काकांच्या संदर्भात तुम्ही काहीतरी करा. त्यांना सांभाळणे आम्हाला आता अशक्य आहे. तुम्हीच ठरवा.’’ मी पू. संकेतदादांना हे सांगितल्यावर दुसर्याच दिवशी त्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण उणावले आणि सर्व नातेवाइकांनी मिळून त्यांचे दायित्व घेतले. ही आमच्यासाठी मोठी अनुभूती होती.
५ ई. पू. संकेतदादांसाठी नामजप करतांना प्रथम पुष्कळ त्रास होणे आणि नंतर परात्पर गुरु डॉक्टरांनीच चिकाटीने नामजप करून घेतल्यामुळे ‘आमच्यावरील त्रासदायक शक्तीचे आवरण निघून जात आहे अन् त्रास न्यून होत आहे’, असे लक्षात येणे : मागील ३ वर्षे पू. संकेतदादांना पुष्कळ वेळा अनिष्ट शक्तींचा त्रास होत असे. (पू. दादांचे सतत आजारी पडणे, चिडचिड करणे, घाबरून मोठ्याने ओरडणे, पू. दादांच्या अंगावर आणि घरात सतत सूक्ष्मातून काळे अन् पिवळे नाग फिरत असल्याचे जाणवणे, त्रासदायक आवरण येणे इत्यादी त्रास वाढले होते.) यासाठी आम्ही त्यांच्यासाठी प्रतिदिन ३ घंटे नामजपादी उपाय करत होतो. त्यांच्यासाठी नामजप करत असतांना मी आणि माझे यजमान यांना पुष्कळ त्रास होत असे. आमच्यावरील त्रासदायक आवरण वाढणे, आमच्या शारीरिक व्याधी वाढणे, कधीकधी आम्हाला ३ – ३ दिवस झोपून रहावे लागणे, तर कधी रक्तदाब उणावणे, चक्कर येणे, कामाची गती मंदावणे, एकाच ठिकाणी घंटोन्घंटे बसून रहाणे इत्यादी त्रास होत असत. या परिस्थितीतही परात्पर गुरु डॉक्टरांनीच आमच्याकडून चिकाटीने नामजप करून घेतला. त्यानंतर पू. संकेतदादांसाठी नामजप करतांना ‘आमच्यावरील त्रासदायक आवरण निघून जात आहे’, हे लक्षात आले आणि आमचे त्रास न्यून होऊ लागले. यासाठी गुरुचरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.
‘हे गुरुमाऊली, पू. संकेतदादा यांच्या संदर्भातील अनुभूती, त्यांनी स्वतःमध्ये केलेले पालट या गोष्टी आपणच आमच्या लक्षात आणून दिल्यात आणि मी हे लिहू शकले, यासाठी तुमच्या कोमल चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– सौ. सुजाता गुरुदास कुलकर्णी (पू. संकेत कुलकर्णी यांची आई, वय ६३ वर्षे), फोंडा, गोवा. (२७.१२.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |