मुलांच्या आरोग्याला हानीकारक असणार्या उत्पादनावर ४८ घंट्यांत कारवाई का केली नाही ? – मुंबई उच्च न्यायालय
‘जॉन्सन अँड जॉन्सन’ आस्थापनाच्या पावडरवरील बंदीचे प्रकरण
मुंबई – ‘जॉन्सन अँड जॉन्सन’ आस्थापनाची ‘बेबी टाल्कम पावडर’ लहान मुलांच्या आरोग्यासाठी हानीकारक होती, तर त्या उत्पादनावर ४८ घंट्यांत कारवाई का केली नाही ? उत्पादन लहान मुलांच्या आरोग्यास हानीकारक असल्याचे मानले, तर २ वर्षे कारवाई न करणे, ही सरकारची तत्परता आहे का ? असा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाने उपस्थित केला.
‘जॉन्सन अँड जॉन्सन’ या आस्थापनाची ‘बेबी टाल्कम पावडर’ लहान मुलांच्या आरोग्यासाठी हानीकारक होती, तर नोव्हेंबर २०१९ पासून या उत्पादनाचा परवाना रहित करण्याच्या कारवाईसाठी झोपला होता का ? हीच तुमची लहान मुलांच्या आरोग्याप्रतीची तत्परता आहे का ? असे प्रश्न न्यायालयाने उपस्थित केले. ‘बेबी टाल्कम पावडर’ आरोग्यास हानीकारक असल्यावरून अन्न आणि औषध प्रशासनाने उत्पादनाचा परवाना रहित करून उत्पादन अन् विक्री तातडीने थांबवण्याचे आदेश दिला.
या निर्णयाच्या विरोधात ‘जॉन्सन अँड जॉन्सन’ आस्थापनाने न्यायालयात धाव घेऊन याचिका निकाली निघेपर्यंत अन्न आणि औषध प्रशासनाच्या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी केली. मुलुंड येथील प्रकल्पामध्ये बेबी पावडरचे उत्पादन आणि विक्री करण्याची अनुमतीही आस्थापनाकडून मागण्यात आली. यांतील केवळ उत्पादन निर्मिती करण्याची मागणी न्यायालयाने मान्य केली होती; मात्र उत्पादनाचा परवाना १५ डिसेंबर या दिवशी संपला आहे. या सुनावणीच्या वेळी आस्थापनाला उत्पादन चालू ठेवण्याची अनुमती दिली.