‘विरजण पडणे’ हा शब्दप्रयोग का वापरतात ?
‘विरजण पडणे’ या मराठीत सर्रास वापरल्या जाणार्या शब्दप्रयोगाविषयी काही जण शंका व्यक्त करतात. विरजणाच्या वापरातून दही, ताक, लोणी, तूप इत्यादी निर्माण होत असतांना एखाद्याने कार्य होऊ शकले नाही किंवा एखाद्याचा उत्साह न्यून झाला, तर त्यावर ‘विरजण पडले’ असा शब्दप्रयोग करतात. मी येथे माझ्या समजुतीप्रमाणे विचार मांडतो. विरजण दुधात घातले की, प्रथम दुधाचे गुणधर्म पूर्ण पालटतात. दूध हे दूध रहात नाही. त्यासाठी हा वाक्प्रचार आहे.
दूध फाटते. दूध नाहीसे होते आणि दही होते. आता त्यातून ताक, लोणी, तूप आदी उपयुक्त खाद्यपदार्थ सिद्ध (तयार) होतात. ही केवळ त्या विधात्याची आणि निसर्गाची किमया असते. अमृत मिळवण्यासाठी देव-दानवांनी समुद्रमंथन केले; पण अमृत आणि अन्य दैवी वस्तूंसमवेत हलाहलही बाहेर आले. ते जगसंहारक विष शिवाला प्यावे लागले ते जगाच्या कल्याणासाठी !
यात विरजण हे प्रथम दुधाचा नाश करते; म्हणून एखादे कार्य झाले नाही वा एखाद्याचा उत्साह न्यून झाला की, त्यावर ‘पाणी पडले’ किंवा ‘विरजण पडले’, असे म्हणतात.
– ग. ना. कापडी, पर्वरी, गोवा.
(साभार : दैनिक ‘नवप्रभा’, १०.१.२०१७)