पतीला भव्य (श्रेष्ठ) करणारे सप्तपदीतील चौथे पाऊल !
अन्नदात्री, ऊर्जादात्री आणि धनदा या तीन पदांविषयी या आधीच्या भागात आपण माहिती घेतली आहे, तसेच विवाह संस्कारांचे महत्त्वही आपण वाचले आहे. आज आपण चौथ्या पदाविषयी जाणून घेऊया.
१. पंडित वाचस्पती मिश्रा यांनी पत्नीच्या त्यागावर प्रसन्न होऊन त्यांच्या ग्रंथाला पत्नीचे नाव देणे
‘मायोभव्याय चतुष्पदी भव ।’ म्हणजे ‘तू माझ्यासमवेत चौथे पाऊल टाक, तू माझे सौख्य वाढवणारी हो’, हा मंत्र म्हणून वराने वधूला चौथ्या तांदुळाच्या राशीवर चालवावे. याचा अर्थ ‘तू चार पावले माझ्या समवेत चाललीस, तू मला भव्य (श्रेष्ठ) करवणारी हो.’ किती उदात्त मागणी आहे पहा ! नवरा पत्नीला म्हणत आहे, ‘तू मला भव्य बनव.’ भव्य म्हणजे बायकोने भरपेट जेवण घालून जाडजूड धिप्पाड बनवणे, असा अर्थ घेऊ नये. हा विपर्यास होईल. शास्त्रकारांना अभिप्रेत आहे, तो अर्थ फार मोठा आणि विस्तृत आहे. भव्य याचा अर्थ समजावून घेतांना पंडित वाचस्पती मिश्रा यांचे उदाहरण समोर ठेवणे आवश्यक आहे. पंडित वाचस्पती मिश्रा हे ‘अद्वैत तत्त्वज्ञान’ या विषयावरचे फार मोठे अधिकारी दार्शनिक होते. त्यांचा विवाह कुलशील संपन्न आणि विद्वान अशा भामती हिच्याशी झाला. पंडित वाचस्पती मिश्रा यांच्या मनात आद्यशंकराचार्यांचे ‘ब्रह्मसूत्र’ सारखे घोळत होते. एवढे कठीण पण अद्वैताचे सर्वाेच्च तत्त्वज्ञान भाष्य सर्वांना सहज सुलभ समजणार कसे, याची चिंता त्यांच्या मनात होती. विवाह झाल्या क्षणीच त्यांनी या ब्रह्मसूत्रावर टीका लिहायला आरंभ केला. काळ लोटू लागला. पंडित मिश्राजींना अन्नपाण्याचेही भान नव्हते. भामती मात्र कोणतीही कटकट न करता शांतपणे पतीची सेवा करत होती. (भोजन आणि घरातील सर्व कामे) पंडितजींना त्यांचे लग्न झाले आहे, याचेही भान नव्हते. एवढे ते ध्यानमग्न झाले होते. बरीच वर्षे लोटली आणि ग्रंथाचे हस्तलिखित पूर्ण झाले. तेव्हा समईच्या मंद प्रकाशात त्यांनी पाहिले की, एक स्त्री आपल्या शेजारी उभी आहे. पंडितजींनी विचारले, ‘‘कोण आपण आणि काय हवे आहे ?’’ तेव्हा भामती म्हणाली, ‘‘महाराज, मी आपली अर्धांगिनी आहे.’’ तेव्हा पंडित मिश्रा भानावर आले. त्यांनी हात जोडले आणि म्हणाले, ‘‘मी एवढी वर्षे तुझ्याकडे लक्ष दिले नाही. मला क्षमा कर.’’ तेव्हा भामती म्हणाली, ‘‘आपण जो ग्रंथ लिहिला, तो समाजाला मार्गदर्शक ठरेल आणि आद्यशंकराचार्यांचे ब्रह्मसूत्र अभ्यासतांना आपला ग्रंथ समवेत घेऊनच तो अभ्यासला जाईल. यातच मला आनंद आहे.’’ तिच्या या अतुलनीय त्यागामुळे पंडित वाचस्पती मिश्रा भव्य झाले. पंडितजींनी तिची स्मृती चिरंतन रहावी, यासाठी या ग्रंथाचे नावच ‘भामती’ ठेवले.
आजही वेदांत तत्त्वज्ञान, ब्रह्मसूत्र शिकणारे त्यावर कला शाखेची पदवी (बीए), पदव्युत्तर पदवी (एम्.ए.) किंवा ‘पीएच्.डी.’ करणारे या भामती ग्रंथाचा आधार घेतल्याखेरीज पुढे जाऊ शकत नाहीत. किती त्याग आहे ! पतीला भव्य बनवतांना आपल्या भौतिक सुखांचा त्याग करणे, हे असामान्य आहे.
२. प्रत्येक श्रेष्ठ पुरुषाच्या कर्तृत्वामध्ये त्याच्या पत्नीचाही मोठा वाटा असणे
आपण अनेक क्रांतीकारकांना वंदन करतो आणि त्यांचे पूजन करतो; पण त्यांच्या या ‘भव्यपणात’ त्यांच्या पत्नींचाही मोठा वाटा आहे, हे विसरतो. जर या क्रांतीकारकांच्या बायकांनी चित्रपट, हॉटेल, शॉपिंग, दागिने, सण-समारंभ, मेजवान्या यांचे हट्ट केले असते, तर आजही आपण पारतंत्र्यातच असतो. शांतीब्रह्म एकनाथ महाराज हे प्रतिदिन अन्नछत्र चालवत होते. अनेक लोक अतिथी भोजन करून तृप्त होऊन जात होते. त्यांचे प्रतिदिन लेखन, प्रवचन आणि कीर्तन नित्य घरी चालत असे. एकनाथ महाराज ‘भव्य’(श्रेष्ठ) झाले. त्यात त्यांच्या पत्नीचाही मोठा वाटा होता. हे नाकारता येणार नाही. त्या माऊलीने तेवढ्याच मायेने आपुलकीने हा सर्व प्रपंच केला; म्हणून हे शक्य झाले. या सर्व मातांचे ‘अलंकार’ काय होते, हे आपण जाणून घेऊ.
हस्तस्य भूषणं दानं सत्यं कण्ठस्य भूषणम् ।
श्रोत्रस्य भूषणं शास्त्रं भूषणै: किं प्रयोजनम् ।।
अर्थ : दान करणे हे हाताचे भूषण, सत्य बोलणे हे कंठाचे भूषण आणि चांगले ऐकणे हे कानांचे भूषण असतांना बाकी अलंकारांचे काय काम ?
या सर्व उदाहरणांमधून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते आणि ती म्हणजे एखादा पुरुष जेव्हा ‘भव्य’ होतो, तेव्हा त्याच्या यशामागे त्याच्या पत्नीचे अपार कष्ट असतात. ‘तुका आकाशा एवढा’ हे म्हणतांना ‘आवडाबाई’ला विसरून चालणार नाही. जगद्गुरु संत तुकाराम महाराज विठ्ठलभक्तीत लीन असतांना या मातेनेच प्रपंचाचे दायित्व सांभाळले होते. ‘काश्यपस्मृति’त स्पष्ट वचन दिले की, ‘दाराधीना: क्रिया: सर्वा दारा: स्वर्गस्य साधनम् ।’ (काश्यपस्मृति, पूर्वपापप्रकरण, श्लोक ४) म्हणजे ‘सर्व कर्मे पत्नीच्या अधीन असतात (पत्नीच्या साहाय्याने करावीत), पत्नी स्वर्गप्राप्तीसाठी साहाय्यभूत होऊ शकते.’
‘नास्ति भार्यासमं तीर्थम् ।’ (पद्मपुराण, भूमिखण्ड, अध्याय ५९, श्लोक २४ आणि ३३) म्हणजे ‘पत्नीसारखे दुसरे तीर्थक्षेत्र नाही.’ पद्मपुराणामध्ये ‘भार्ये’ला (पत्नीला) ‘तीर्थ’ संबोधले आहे. तिची तुलना होऊ शकत नाही, हेच सांगितले आहे. तेव्हा सर्व पतीदेवांना विनंती आहे की, आपण बाहेर कष्ट करून पैसे, नाव, पद, प्रतिष्ठा (भव्यता) मिळवाल; पण त्या सर्वांच्या मागे एक खंबीर शक्ती उभी असते, ती म्हणजे ‘पत्नी’ आहे. ती खंबीरपणे घर सांभाळते; म्हणूनच आपण बाहेर पराक्रम गाजवू शकतो, हे विसरू नये, तरच हे चौथे पाऊल सार्थकी लागेल.
– वेदमूर्ती भूषण दिगंबर जोशी, वेंगुर्ला, सिंधुदुर्ग. (६.१२.२०२२)