नारायणपूर (छत्तीसगड) येथे धर्मांतराच्या विरोधातील बंदच्या वेळी आदिवासींकडून चर्चची तोडफोड !

पोलीस अधीक्षकांनाही मारहाण

नारायणपूर (छत्तीसगड) – येथे २ जानेवारी या दिवशी आदिवासींनी ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून होणार्‍या धर्मांतराच्या विरोधात बंदचे आवाहन केले होते. या वेळी काही आदिवासींनी एका चर्चची आणि तेथील येशूच्या मूर्तीची तोडफोड केली. या वेळी घटनास्थळी येऊन पोलिसांनी लाठीमार केल्यावर संतप्त आदिवासींनी येथील पोलीस अधीक्षक सदानंद कुमार यांच्यावर आक्रमण केले. त्यात ते घायाळ झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात भरती करण्यात आले.

१. गेल्या १५ दिवसांपासून येथे धर्मांतरावरून वाद चालू असल्याने तणाव होता. त्यातच २ जानेवारीला बंदचे आवाहन करण्यात आले होते. ३१ आणि १ जानेवारी या दिवशी येथील गोर्रा गावामध्ये ख्रिस्ती आणि आदिवासी यांच्यात हाणामारीही झाली होती. या हाणामारीत घायाळ झालेल्या आदिवासींनी ख्रिस्त्यांवर कारवाई करण्यासाठी बंदचे आवाहन केले होते.

२. बंदच्या दिवशी पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांनी सर्व आदिवासी समाजातील पदाधिकार्‍यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीनंतर आदिवासी समाजातील लोक एका चर्चमध्ये घुसले आणि तेथे त्यांनी तोडफोड केली.
घटनास्थळी पोलीस अधीक्षक सदानंद कुमार पोचले असता त्यांच्यावरही आक्रमण करण्यात आले.

३. जिल्हाधिकारी अजित वसंत म्हणाले की, सध्या स्थिती नियंत्रणात आहे. मारहाण करणार्‍यांवर गुन्हा नोंदवून कठोर कारवाई करण्यात येईल. कुणालाही सोडले जाणार नाही.

संपादकीय भूमिका

‘देशात धर्मांतरविरोधी कायदा नसल्याने आता जनताच धर्मांतराचा विरोध करण्यासाठी कायदा हातात घेत आहेत’, असे म्हटल्यास चूक ते काय ? याकडे सरकारने गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे !