भाजपचे पिंपरी-चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे पुण्यात कर्करोगाच्या आजारामुळे निधन !

भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन !

पुणे – पिंपरी-चिंचवड विधानसभेचे भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे वयाच्या ५९ व्या वर्षी कर्करोगाच्या आजारामुळे निधन झाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून लक्ष्मण जगताप कर्करोगाने ग्रस्त होते. बाणेर येथील खासगी रुग्णालयात उपचार असतांना ३ जानेवारी या दिवशी त्यांची प्राणज्योत मालवली. लक्ष्मण जगताप हे लढवय्ये नेते होते. पिंपरी-चिंचवड शहरातील महत्त्वाचे नेते म्हणून त्यांची ओळख होती. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे प्रतिनिधित्व करण्यापासून त्यांनी राजकारणाला प्रारंभ केला होता. त्यांनी महापौर, तसेच स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून दायित्व सांभाळले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपचे नेते आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या निधनाविषयी शोक व्यक्त केला आहे.

आमदार जगताप यांच्या निधनानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेची अत्यावश्यक सेवा वगळता सर्व कार्यालये ३ जानेवारी या दिवशी बंद रहातील, असे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी सांगितले.

या वेळी शोक व्यक्त करतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून लक्ष्मण जगताप हे कार्यरत होते. पिंपरी-चिंचवड शहरामध्ये त्यांची लोकप्रियता होती. आजारी असतांनाही विधीमंडळातील निवडणुकीसाठी ‘व्हिलचेअर’वरून रुग्णवाहिकेतून थेट ‘पीपीई किट’ घालून विधानभवनात येऊन त्यांनी मतदान केले. तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विजयाचे श्रेय त्यांना आणि मुक्ता टिळक यांना दिले होते.

या वेळी चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, पिंपरी-चिंचवडमधून ३ वेळा निवडून आलेले आमदार आणि माझे जवळचे सहकारी लक्ष्मण जगताप यांचे निधन पुष्कळच धक्कादायक आहे. पक्षनिष्ठा आणि समर्पणाचा लक्ष्मणजी वस्तूपाठ होते. बरे होतील असे वाटतांनाच त्यांचे असे जाणे चटका लावणारे आहे. आम्ही सगळे जगताप कुटुंबासमवेत आहोत.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांची आमदार जगताप यांना श्रद्धांजली

चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने जनतेच्या प्रश्नासाठी तळमळीने काम करणारा झुंजार लोकप्रतिनिधी, जवळचा सहकारी आज गमावला आहे.

राजकीय, सामाजिक जीवनात त्यांनी केलेले काम कायम स्मरणात राहील, अशा शब्दात राज्याच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आमदार जगताप यांना श्रद्धांजली अर्पण केली.

हिंदु जनजागृती समितीच्या कार्याला सकारात्मक प्रतिसाद

आमदार लक्ष्मण जगताप

हिंदु जनजागृती समितीच्या कार्याला ते नेहमी सकारात्मक प्रतिसाद द्यायचे. सांगवी (जिल्हा पुणे) येथे २९ ऑगस्ट या दिवशी ‘हलाल जिहाद’ या संदर्भात जागृती करण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीचे संपूर्ण नियोजन त्यांनी केले होते. त्या वेळी त्यांनी ‘हलाल जिहाद’चे २ सहस्र ग्रंथ घेऊन त्याचे वितरण केले होते. प्रतिवर्षी ते ‘सनातन पंचांग’ ५०० पंचांग घ्यायचे.