सातारा येथे माजी आमदाराच्या बंद निवासाच्या परिसरात आढळला अर्धवट पुरलेला मृतदेह !
सातारा – भाजपच्या माजी आमदार कांताताई नलवडे यांच्या बंद असलेल्या निवासस्थानाच्या परिसरात मातीत अर्धवट पुरलेला मृतदेह आढळून आला आहे. तालुका पोलिसांचे रात्री उशिरापर्यंत मृतदेहाविषयी माहिती घेण्याचे काम चालू होते.
वाढे येथे माजी आमदार कांताताई नलवडे यांचे निवासस्थान आहे. या निवासस्थानाच्या परिसरात ३० डिसेंबर या दिवशी दुपारी अर्धवट पुरलेल्या स्थितीत एक मृतदेह आढळून आला. याची माहिती पोलिसांना देण्यात आली. निवासस्थानाच्या परिसराची स्वच्छता करतांना हा प्रकार समोर आला आहे. मृतदेह कुजलेल्या स्थितीत आहे. यामुळे तो महिलेचा कि पुरुषाचा ? हे अद्याप समजू शकलेले नाही. या प्रकरणाविषयी पोलीस आजूबाजूला चौकशी करत आहेत.