स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष श्री. रणजित सावरकर यांनी वीर सावरकर यांच्याविषयी उलगडलेले पैलू
श्री. रणजित सावरकर ‘एबीपी न्यूज, हिंदी’ या वृत्तवाहिनीवर २६ नोव्हेंबर २०२२ या दिवशी ‘प्रेस कॉन्फरन्स’ या कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्या वेळी त्यांनी वाहिनीच्या संपादक मंडळाकडून विचारण्यात आलेल्या प्रश्नांना सविस्तर उत्तरे दिली. त्यातील काही प्रश्नोत्तरे येथे देत आहोत.
प्रश्न : वीर सावरकर स्वतःला सुभाषचंद्र बोस यांच्याजवळ मानायचे कि भगतसिंह ?
उत्तर : भगतसिंह
प्रश्न : वीर सावरकर यांना तुम्ही कुणाच्या जवळ बघता वाजपेयी कि मोदी ?
उत्तर : मोदी
प्रश्न : वीर सावरकर यांचे १८५७ चे बंड हे पुस्तक तुम्हाला आवडते कि हिंदुत्व?
उत्तर : हिंदुत्व
प्रश्न : वीर सावरकर यांना वाजपेयी ‘बहुरंगी व्यक्तीमत्त्व’ म्हणाले. तुम्ही सावरकर यांना कसे पहाता ?
उत्तर : वाजपेयी हे सावरकर यांना ‘बहुरंगी व्यक्तीमत्त्व’ म्हणाले. सावरकर कवी होते; पण माझ्या दृष्टीने तर्कशास्त्री, बुद्धीवादी, राष्ट्रवादी नेता ही त्यांची खरी ओळख मला वाटते.
प्रश्न : मोदी सरकारने सावरकर यांना अजून ‘भारतरत्न’ दिला नाही, यावर काय म्हणायचे ?
उत्तर : मी स्वतः वीर सावरकर यांना ‘भारतरत्न’ द्यावा, अशी मागणी करत नाही; कारण जनतेने त्यांना दिलेला ‘स्वातंत्र्यवीर’ हा सन्मान मोठा आहे. मग काँग्रेसने तरी गांधींना ‘भारतरत्न’ का दिला नाही ? सरकारला वीर सावरकर यांना ‘भारतरत्न’ द्यायचा असेल तर द्यावा. आम्हाला काही अपेक्षा नाही.
प्रश्न : सावरकर यांच्याविषयी कर्नाटकातील पाठ्यपुस्तकातील उल्लेख चुकीचा आहे का ?
उत्तर : वीर सावरकर यांनी म्हटले होते कि, मी जेव्हा कोठडीत असायचो, तेव्हा माझे मन बाहेर भ्रमंती करायचे. जेव्हा मी कोलू ओढायचो, वेदना व्हायच्या, तेव्हा माझे शरीर कोलू ओढत होते; पण माझे मन मी बाहेर पाठवायचो. त्याचे आकलन करण्यात चूक झाल्यामुळे कर्नाटकातील पाठ्यपुस्तकात त्याचा चुकीचा संदर्भ देण्यात आला. पुस्तकातील उल्लेख चुकीचाच आहे.
प्रश्न : कपूर कमिशनमध्ये सावरकर यांना गांधी हत्येतील आरोपी म्हटले आहे का ?
उत्तर : कपूर कमिशनने ‘वीर सावरकर हे म. गांधी यांच्या हत्येतील आरोपी आहेत’, असे म्हटलेले नाही. त्यांच्या अहवालावर सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट म्हटले होते, ‘कपूर कमिशनने कुठेही वीर सावरकर यांना गांधी हत्येततील आरोपी म्हटलेले नाही.’
– श्री. रणजित सावरकर
(साभार : ‘हिंदुस्थान पोस्ट’चे वृत्तसंकेतस्थळ, २६.११.२०२२)
गांधींना ‘राष्ट्रपिता’ कसे काय मानतो ?
‘जर आपण प्रभु रामचंद्र यांना ‘राष्ट्रपिता’ मानत नसलो, तर गांधींना कसे काय मानतो ? गांधींनी देशाला जन्म दिलेला नाही. हा अत्यंत पुरातन देश आहे. गांधींनी स्वातंत्र्याची मागणी वर्ष १९३० मध्ये केली. त्यांचे वर्ष १९३० चे आंदोलन मागे घेतांना गांधी हे भगतसिंह यांना वाचवू शकले असते; पण ते वाचवू शकले नाहीत. वर्ष १९४२ चे ‘भारत छोडो’ आंदोलन ब्रिटिशांनी अवघ्या ५ दिवसांत संपवले. तेव्हा विमानातून ‘मशीन गन’ने गोळ्या झाडून शेकडो क्रांतीकारकांना ठार केले. त्याचाही गांधींनी एका शब्दाने निषेध केला नाही. पुढे ५ वर्षांनी पुन्हा वर्ष १९४२ चे आंदोलन चालू झाले. भारताला स्वातंत्र्य मिळाले; पण देशाचे विभाजन झाले. भारताच्या फाळणीमध्ये २० लाख लोक मारले गेले. याला कारण आहे की, सत्तेच्या हव्यासामुळे यांनी फाळणीचा दिनांक ११ मास आधी घेतला गेला. त्या वेळी प्रशासन, पोलीस आणि सैन्य यांची विभागणी झाली नसल्यामुळे दंगली झाल्या, २० लाख लोक मारले गेले.
– श्री. रणजित सावरकर