परिपूर्ण सेवेची तळमळ असलेल्या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती मंगला पुराणिक (वय ६९ वर्षे) !
१. व्यवस्थितपणा
‘श्रीमती मंगला पुराणिककाकू स्वयंपाकघरात सेवा करतांना ‘ओट्यावर पसारा होऊ नये आणि ओटा स्वच्छ दिसावा’, याकडे लक्ष देतात. ‘पसारा होत आहे’, असे वाटले की, त्या लगेचच आवरायला घेतात.
२. वेळेचे गांभीर्य
काकू सेवेसाठी नेहमी वेळेत येतात. वेळ वाया जायला नको; म्हणून त्या सतत सेवा करतात.
३. परिपूर्ण सेवा करणे
‘गुरुसेवा परिपूर्ण व्हावी’, या दृष्टीने त्यांचे प्रयत्न असतात. ‘सेवा करतांना घाई-गडबड होऊ नये’, यासाठी ‘पूर्वसिद्धता झाली आहे ना ?’, याची त्या निश्चिती करतात. ‘सेवा करतांना त्रास होऊ नये’, यासाठी काकू मला वेळोवेळी साहाय्य करतात.
४. शिकण्याची वृत्ती
काकूंना एखादा पदार्थ बनवायला अडचण येत असल्यास त्या इतरांना विचारून तो बनवण्याचा प्रयत्न करतात.
५. सतर्कता
त्यांचे ‘कोणत्या शेगडीवर कोणती भाजी आहे ? ती भाजी शिजायला किती वेळ लागेल ? कोणत्या कुकरमध्ये काय आहे ?’, याकडे सतर्कतेने लक्ष असते. ‘मला काही इजा व्हायला नको’, यासाठी त्या मला सतत सतर्क रहायला सांगतात.
६. तत्परता आणि निर्णयक्षमता
एकदा मी एक भाजी बनवत असतांनाच दुसर्या भाजीसाठी फोडणी घालत होते. त्या वेळी माझे पहिल्या भाजीकडे दुर्लक्ष झाल्याने ती करपत होती. त्या वेळी पुराणिककाकूंनी शांतपणे ‘अशा वेळी आपण काय करू शकतो ?’, हे मला सांगितले. नंतर त्यांनी भाजी आणखी करपू नये, यासाठी तिच्यात खोबरे आणि साखर घातली. त्यामुळे त्या भाजीची चव आणखी चांगली झाली. त्यांच्याकडून मला ‘तत्परता, निर्णयक्षमता आणि समयसूचकता’ हे गुण शिकायलामिळाले.
७. स्वीकारण्याची वृत्ती
एकदा काकूंनी मला एका आजींसाठी एक भाजी स्मॅशरने (अर्थ : पदार्थ घोटून बारीक करण्याच्या साधनाने) बारीक करायला सांगितली होती. त्या वेळी ‘पातेल्याच्या खाली जाड कापड घ्यायला पाहिजे’, हे काकूंनी मला सांगितले नव्हते. एका साधिकेने त्यांना ही चूक सांगितल्यावर त्यांनी लगेचच क्षमायाचना केली.
८. व्यष्टी साधनेचे गांभीर्य
त्या व्यष्टी आणि समष्टी साधना यांची सांगड उत्तम प्रकारे घालतात. त्या सेवा करतांना स्वतःची व्यष्टी साधना होण्याकडेही लक्ष देतात. त्या त्यांच्या नियोजित वेळेत स्वयंसूचना सत्रे करतात.
‘परात्पर गुरुदेव, काकूंच्यातील गुण माझ्यात येण्यासाठी मला प्रयत्न करता येऊ देत. त्यासाठी तुम्हीच मला साहाय्य करा’, अशी मी शरणागतभावाने प्रार्थना करते. श्री गुरूंच्या कृपेमुळे काकूंच्यातील गुण माझ्या लक्षात आले, त्याबद्दल गुरुचरणी कोटीशः कृतज्ञता !’
– कु. वैदेही गजानन खडसे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.४.२०२२)