(म्हणे) ‘औरंगजेब क्रूर आणि हिंदुद्वेष्टा असता, तर त्याने विष्णूचे मंदिरही फोडले असते !
|
ठाणे, २ जानेवारी (वार्ता.) – छत्रपती संभाजी महाराजांना आम्ही पहिल्यापासूनच ‘स्वराज्यरक्षक’ म्हणतो. ते संगमेश्वरला सरदेसाईंच्या वाड्यात होते. ही बातमी औरंगजेबाला दिली कुणी ? इथेच तर खरा इतिहास आहे. छत्रपती संभाजी महाराजांना बहादूरगडावर नेण्यात आले. तेथे त्यांचे डोळे काढण्यात आले. त्या ठिकाणी बाजूला विष्णूचे मंदिर आहे. औरंगजेब क्रूर आणि हिंदुद्वेष्टा असता, तर त्याने विष्णूचे मंदिरही फोडले असते. तेथून छत्रपती संभाजीराजांना तुळापूरला नेण्यात आले. त्यानंतर पुढे काय झाले, तो इतिहास सगळ्यांनाच ठाऊक आहे. त्यामुळे उगाच नको त्या इतिहासात जाऊ नका. इतिहास वाद वाढवतो, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. या प्रकरणी हिंदुत्वनिष्ठ संतप्त झाले आहेत.
(सौजन्य : ABP MAJHA)
लेखक आणि व्याख्याते दुर्गेश परुळकर यांचा उपहासगर्भ अभिप्राय !
औरंगजेब हा अत्यंत दयाळू माणूस होता. त्याने प्रेमाने विश्वनाथाचे मंदिर मशिदीत स्थापन करण्यास सांगितले. ही त्याची विशाल दृष्टी आहे. जगात विविध देवतांची आवश्यकता नाही. एकच देव हवा. तोसुद्धा त्याला आवडेल तोच. अशा प्रकारची औरंगजेबाची विचारसरणी होती. त्याच्या दृष्टीने सहिष्णुता ही भंपकता होती. हा सगळा खुळचटपणा हिंदु संस्कृतीत असल्यामुळे त्याने सहिष्णुतेला तिलांजली दिली. ज्या लोकांना हिंदु धर्माविषयी अभिमान होता, त्यांना त्याने मुक्ती दिली. हा प्रेमळपणा त्याने छत्रपती संभाजी महाराजांविषयीही दाखवला होता. आव्हाड औरंगजेबाकडे अशा दृष्टीने बघत असल्यामुळे त्यांची ही विशाल दृष्टी संकुचित हिंदूंना दिसत नाहीत, असा उपहासगर्भ अभिप्राय लेखक आणि व्याख्याते दुर्गेश परुळकर यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वार्ताहराशी बोलतांना दिली.