सप्तपदी

सर्व वेदवेत्या गुरुजनांना वंदन करुन ‘सप्तपदी’ या लेखमालेत हे तृतीय पुष्प गुंफत आहे. पहिल्या दोन भागांमध्ये विवाह संस्काराविषयी थोडेस प्रबोधन, तसेच अन्नदात्री आणि  ऊर्जादात्री या सप्तपदीतील प्रथम दोन पावलांविषयी थोडक्यात माहिती घेतली. आज तृतीय पावलाचे महत्त्व समजून घेऊया. आज तृतीय पावलाच्या निमित्ताने तरुण मुला-मुलींना एक प्रश्न विचारणार आहे. मनापासून आणि सत्य उत्तर स्वत:लाच द्यावे ही विनंती !

योग्य मार्गाने धन मिळवून बचत करण्यास सांगणारे सप्तपदीतील तिसरे पाऊल

‘‘मेजवानीला जाऊन मद्यपान करणारी, जुगार खेळणारी, रात्रभर घरी न येणारी आधुनिक ‘मम्मा’ हवी ? कि आपल्या मायेच्या पदराची ऊब देणारी, वेळप्रसंगी दोन धपाटे देणारी आणि आपल्यासमवेत सदैव मायेचा आधारवड असणारी आपली आई हवी ?’’

यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः ।
यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफलाः क्रियाः ।। – मनुस्मृति, अध्याय ३, श्लोक ५६

अर्थ : जेथे स्त्रियांची पूजा होते, तेथे देवता रममाण होतात. जेथे त्यांची पूजा होत नाही, तेथे (यज्ञयागादी) सर्व क्रिया निष्फळ ठरतात.

‘ज्या ठिकाणी स्त्रियांची पूजा होते (त्यांचा यथोचित मानसन्मान होतो.) त्या ठिकाणी देवता वास्तव्य करतात. जेथे स्त्रियांचा अपमान होतो, तेथे देवता प्रसन्न रहात नाहीत. कितीही  यज्ञयाग केले, तरी निष्फळच होतात’, हे मनुस्मृतिमध्ये दिले आहे. (मनुस्मृतीवर टीका करणार्‍यांनी हे वाचलेले नसते. त्यामुळे ‘मनुवादी’ वगैरे उपाधी लावून ते मोकळे होतात.)

वेदमूर्ती भूषण दिगंबर जोशी

आज हे का सांगत आहे, तर सप्तपदीतील तिसरे पाऊल टाकतांना जो मंत्र उच्चारला जातो, तो आहे…

‘रायस्पोषाय त्रिपदी भव ।’ म्हणजे ‘तू माझ्यासमवेत तीन पावले चाललीस, माझे धन वाढवणारी हो.’ वर म्हणतो, ‘‘हे वधू, तू माझ्याबरोबर तीन पावले चाललीस. तू माझे धन वाढवणारी हो. आता धन वाढवणारी म्हणजे, एखादा जण या मंत्राचा अर्थ वधूने तिच्या मातापित्यांकडून पैसे, दागिने आदी आणावे, असा घेईल; परंतु तसे शास्त्रकारांना अभिप्रेत नाही. पतीने जे द्रव्य मिळवले आहे, त्याचा योग्य विनियोग केल्यानंतर जे शिल्लक राहील, त्या धनाची साठवण (बचत) करून ठेव. बचत ही वृद्धीच आहे. एक सुंदर सुभाषित आहे.

क्षणशः कणशश्चैव विद्यामर्थं च साधयेत् ।
क्षणत्यागे कुतो विद्या कणत्यागे कुतो धनम् ।।

अर्थ : क्षणाक्षणाने विद्या आणि कणाकणाने धन गोळा करावे. जर क्षण वाया घालवला, तर विद्या कशी मिळेल ? जर कण वाया घालवला, तर धन कसे मिळेल ?

क्षण आणि कण यांनी विद्या अन् अर्थ (धन) प्राप्त होते. जो क्षण (वेळ) फुकट घालवतो, त्याला विद्या मिळत नाही आणि जो कण व्यर्थ घालवतो, त्याला धन मिळत नाही. त्यामुळे  घरच्या माऊलीवर हे दायित्व आहे की, घरातील द्रव्य हे योग्य विनिमय करून मिळवावे आणि त्यातून बचत करावी अन् ही बचत करणे, म्हणजेच ‘धन वाढवणे’ होय. एक ठराविक काळच तारुण्य असते. याच काळात आपल्याला काहीतरी तजवीज करून ठेवावी लागते. (पूर्वी ही तजवीज भूमी, शेती, सुवर्ण अलंकार, गोधन या रूपात केली जात असे.)

अलीकडे अनेक कुटुंबात ‘शॉपिंग’ (खरेदी) हे वादाचे कारण होतांना दिसते. प्रत्येक आठवड्याला ‘शॉपिंग’, उपाहारगृहात जेवायला जाणे, सहलीला जाणे, चित्रपट पहायला जाणे, पिकनिक यांचा अतिरेक होत आहे. (दुकानामध्ये जो समोसा १० रुपयांना मिळतो, तोच चित्रपटगृहामध्ये १०० रुपयांना मिळतो.) आपण आठवडाभर पोट मारून केलेली बचत एका क्षणात संपते. हे आपण लक्षातच घेत नाही.

‘गोरी बनवणारी क्रिम’ हे काय ‘फॅड’ आहे? आणि त्यासाठी उधळपट्टी का ? विठोबा सावळा, गोपाळकृष्ण, प्रभु रामचंद्र हे सर्व सावळेच परब्रह्म आहेत. अनेक सावळ्या अभिनेत्यांच्या कलेवर आपण सर्व भरभरून प्रेम करतो. त्यात त्यांचा रंग आड येत नाही. मग ‘गोरेपणासाठी एवढी उधळपट्टी का ? आपले गुण हे रूपापेक्षा नेहमीच वरचढ ठरतात. तेव्हा नवदांपत्यांनो, थोडे जागृत व्हा, नीट डोळे उघडा. आपण सप्तपदीतील तिसरे पाऊल जे ‘धनवृद्धी करणारी हो’ , याचे आचरण करतो का ? हे नीट पहा.

एक सुभाषित सांगतो…

आयषुः क्षण एकोऽपि सर्वरत्नैर्न लभ्यते ।
नीयते स वृथा येन प्रमादः सुमहानहो ॥

अर्थ : जगातील सर्व रत्ने देऊनही आयुष्याचा एक क्षणसुद्धा पुन्हा मिळवता येत नाही. असे बहुमूल्य जीवन जो वाया घालवतो, तो मोठा अपराधी होय.

आयुष्यातील एक क्षणही सर्व मौल्यवान रत्नांनी परत मिळवता येत नाही. ज्याच्याकडून आयुष्य फुकट घालवले जाते, तो मोठा अपराधीच आहे. तेव्हा आजची बचत ही उद्याची वृद्धी आहे. हे विसरू नये. कृपया याचा ‘कंजुषपणा’ असा अर्थ न घेता आवश्यक तेथे आणि आवश्यक तेवढाच व्यय करावा. अन्यथा बचत करावी, हे सार आहे.

– वेदमूर्ती भूषण दिगंबर जोशी, वेंगुर्ले, सिंधुदुर्ग (६.१२.२०२२)