‘तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’ या आतंकवादी संघटनेला नष्ट करा, अन्यथा आम्ही करू !
पाकची तालिबानला चेतावणी
इस्लामाबाद (पाकिस्तान) – ‘तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी)’ या आतंकवादी संघटनेने पाकमध्ये समांतर सरकार स्थापन केल्यानंतर पाकने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘टीटीपीच्या आतंकवाद्यांना अफगाणिस्तानमध्ये आश्रय मिळाला आहे. तालिबानने या आतंकवाद्यांना नष्ट केले नाही, तर आम्ही अफगाणिस्तानमध्ये घुसून टीटीपीला नष्ट करू’, अशी चेतावणी पाकच्या गृहमंत्र्यांनी तालिबानला दिली. त्यावर तालिबानने पाकचा आरोप आधारहीन असल्याचे म्हटले आहे.
तालिबानच्या संरक्षण मंत्रालयाने एक निवेदन प्रसारित करून म्हटले आहे की, पाकिस्तानी गृहमंत्र्यांनी केलेले विधान दोन्ही देशांमधील चांगल्या संबंधांना हानी पोचवणारे आहे. पाकचे विधान चिथावणीखोर आहे. टीटीपीचे आतंकवादी अफगाणिस्तानमध्ये नाही, तर पाकच्या सीमेमध्ये आश्रय घेऊन रहात आहेत. पाकच्या सैन्याने दोन्ही देशांमधील चिंता सामंजस्याने सोडवावी.