अग्नीअस्त्र
सनातनची ‘घरोघरी लागवड’ मोहीम : लेखांक ५९
‘अग्नीअस्त्र’ हे सुभाष पाळेकर कृषी तंत्रातील एक नैसर्गिक कीटक नियंत्रक आहे. पिकांवरील रसशोषक किडी, पाने, शेंगा खाणार्या अळ्या यांवर नियंत्रणासाठी अग्नीअस्त्राची फवारणी करतात. हे घरच्या घरी सिद्ध करता येते.
१. घरगुती लागवडीसाठी अग्नीअस्त्र बनवण्यासाठी आवश्यक साहित्य : देशी गायीचे मूत्र १ लिटर (१ तांब्या), कडुनिंबाचा पाला १०० ग्रॅम (एक ओंजळ भरून), तंबाखू २५ ग्रॅम (साधारण अर्धी वाटी), तिखट हिरव्या मिरचीची चटणी ५० ग्रॅम (साधारण १० चमचे), लसुणीची चटणी १२ ते १५ ग्रॅम (साधारण ४ चमचे), ठेचलेले आले १० ग्रॅम (साधारण २ इंच), हळद पूड १० ग्रॅम (२ चमचे).
येथे चमच्यांचे प्रमाण चहाच्या चमच्यांत दिले आहे. मिरची, आले आणि लसूण मिक्सरमध्ये न वाटता खलबत्त्यात कुटून घ्यावी. लसूण सालासकट घ्यावी. वरील सर्व प्रमाण थोडे अल्प-अधिक झाले, तरी अपाय होत नाही. साधारण १ लिटर अग्नीअस्त्रासाठीचे हे प्रमाण आहे. यापेक्षा अल्प प्रमाणात हे बनवायचे झाल्यास तेवढ्या प्रमाणात सर्व घटक अल्प घ्यावेत.
२. कृती : वरील सर्व साहित्य पातेल्यात एकत्र करून ढवळावे आणि पातेल्यावर झाकण ठेवून मंद आचेवर एक उकळी काढावी. हे मिश्रण ४८ घंटे असेच झाकून ठेवावे आणि दिवसातून २ वेळा ढवळावे. ४८ घंट्यांनंतर सिद्ध झालेले अग्नीअस्त्र कापडाने गाळून बाटलीत भरून ठेवावे आणि बाटलीवर सिद्ध झालेल्या दिवसाच्या दिनांकाची नोंद करावी.
अग्नीअस्त्र सिद्ध झाल्यापासून ३ मास वापरू शकतो. याचे तुषारसिंचन (फवारणी) करतांना १ लिटर (१ तांब्या) पाण्यात ३० ते ४० मिलि (पाव वाटी) अग्नीअस्त्र मिसळून तुषारसिंचन करावे.’
– सौ. राघवी मयूरेश कोनेकर, ढवळी, फोंडा, गोवा. (२३.१२.२०२२)