पंढरपूर कॉरिडॉर अंतर्गत श्रीमंत अहिल्यादेवी होळकर वाड्याचे जतन करा !
पुरातत्व विभागाची सोलापूरच्या जिल्हाधिकार्यांना सूचना
पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – प्रस्तावित पंढरपूर कॉरिडॉर अंतर्गत चंद्रभागेच्या काठावरील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वाड्याचे जतन करण्याच्या सूचना पुरातत्व विभागाने जिल्हाधिकार्यांना पत्राद्वारे दिल्या आहेत. चंद्रभागा नदीकडे जाणारा महाद्वार घाट मोठा करण्याचा प्रस्ताव असून या घाटावर श्रीमंत होळकर वाडा ही ऐतिहासिक वास्तू आहे. महाराष्ट्र सरकारच्या पुरातत्व आणि वस्तूसंग्रहालये संचालनालयाचे संचालक डॉ. तेजस गर्गे यांनी सोलापूरच्या जिल्हाधिकार्यांना हे पत्र दिले आहे.
या पत्रात म्हटले आहे की, ‘अहिल्यादेवी होळकर चॅरिटेबल ट्रस्ट’ हा खासगी ऐतिहासिक वाडा पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात समाविष्ट केला असून महाद्वार पोलीस चौकी ते महाद्वार घाट रस्ता रुंदीकरणात अहिल्यादेवी यांचे वास्तव्य असणारा होळकर वाडा बाधित होणार आहे. या ऐतिहासिक वारसा वास्तूचे महत्त्व विचारात घेऊन त्याची कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही, याची काळजी घेऊन कार्यवाही व्हावी. याविषयी होळकर वाड्याचे व्यवस्थापक आदित्य फत्तेपूरकर यांनी केंद्रशासनाच्या पुरातत्व विभागास सदर वास्तू विषयक सविस्तर माहिती देत तो बाधित होऊ नये, यासाठी निवेदन दिले होते.