घरच्या घरी करा ‘सुवर्णप्राशन’ !
‘आजकाल पुष्कळ ठिकाणी लहान मुलांना प्रत्येक मासात पुष्य नक्षत्रावर ‘सुवर्णप्राशन’ केले जाते. ‘सुवर्ण’ म्हणजे ‘सोने’. यापासून बनवलेले औषध या दिवशी लहान मुलांना देतात. याला ‘सुवर्णप्राशन’ म्हणतात. सुवर्णप्राशनाचे उल्लेख ‘काश्यपसंहिता’, ‘अष्टांगहृदय’ इत्यादी आयुर्वेदाच्या ग्रंथांत आढळतात. ‘उत्तम प्रतीचे सुवर्णभस्म (सोन्याचे भस्म) लहान मुलांना दिल्यास मुलांची रोगप्रतिकारक क्षमता, तसेच बौद्धिक क्षमता वाढते’, असे आयुर्वेदात सांगितले आहे. हे सुवर्णप्राशन घरच्या घरी करायचे झाल्यास पुढील प्रकारे करावे –
‘वसंत मालती (स्वर्ण)’ किंवा ‘महालक्ष्मीविलास’ यांपैकी कुठल्याही एका औषधाच्या एका गोळीची बारीक पूड करावी. ती चहाचा अर्धा चमचा साजूक तूप आणि एक चमचा मध यांच्या मिश्रणामध्ये मुलांच्या वयोगटानुसार पुढील प्रमाणात नीट मिसळून मुलांना चाटवावी. नवजात बालकांपासून ३ वर्षांपेक्षा अल्प वयांच्या मुलांसाठी पाव गोळी, ३ ते ७ वर्षांच्या मुलांसाठी अर्धी गोळी आणि त्याहून मोठ्या (१६ वर्षांपर्यंतच्या) मुलांसाठी १ गोळी असे वयोमानानुसार प्रमाण ठेवावे. राहिलेली पूड कोर्या कागदाच्या पुडीत ठेवून पुढच्या वेळी वापरावी. असे सुवर्णप्राशन प्रत्येक मासातून एकदा पुष्य नक्षत्र असतांना सकाळी मूल रिकाम्या पोटी असतांना करावे.
कोरोनाच्या दुसर्या लाटेच्या वेळी पुष्कळ जणांनी ‘वसंत मालती (स्वर्ण)’ किंवा ‘महालक्ष्मीविलास’ ही औषधे घेऊन ठेवलेली होती. त्या औषधांचा सुवर्णप्राशनासाठी उपयोग करता येऊ शकतो. ८ जानेवारीला पुष्य नक्षत्र आहे.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.१२.२०२२)