वाघाच्या कातड्याच्या तस्करी प्रकरणी तिघांना घेतले कह्यात !
वनविभाग आणि रत्नागिरी आतंकवादविरोधी पथकाची संयुक्त कारवाई
चिपळूण (जि. रत्नागिरी) – तालुक्यातील चिवेली फाटा येथे वाघाच्या कातड्याच्या तस्करी प्रकरणी वनविभाग आणि रत्नागिरी आतंकवादविरोधी पथकाने हेमंत भिकू रामाणे (बोरीवली), दिनेश लक्ष्मण तांबीटकर (बामणोली) आणि आशितोष मुकुंद धारसे (मोटवली, महाड) या तिघांना कह्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे.
वन्यप्राण्याच्या कातडीची अवैध तस्करी आणि विक्रीच्या उद्देशाने काही जण येणार असल्याची बातमी मिळाल्यानंतर वनविभाग आणि आतंकवादविरोधी पथकाने सापळा रचला होता. या वेळी संशयितांकडे चौकशी केल्यानंतर त्यांच्याकडे असलेल्या पिशवीची तपासणी केल्यानंतर त्यामध्ये वाघाचे कातडे असल्याचे आढळून आले.
ही संयुक्त कारवाई आतंकवादविरोधी पथकाकडून पोलीस उपनिरिक्षक व्हि.के. नरवणे आणि अन्य पोलीस, तसेच चिपळूणचे वनपाल डी.आर्. भोसले, गुहागरचे वनपाल एस्.व्हि. परशेट्ये आणि अन्य वनरक्षक यांनी केली. पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, विभागीय वनअधिकारी दीपक खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. अधिक अन्वेषण येथील पोलीस करत आहेत.