जगभरातील प्रमुख देशांना नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागणार !
‘ज्योतिष ज्ञान’ या त्रैमासिकात ज्योतिषी सिद्धेश्वर मारटकर यांचे भाकित
पुणे – ग्रह आणि नक्षत्र यांच्या स्थितीवरून जानेवारी २०२३ मध्ये जगभरातील प्रमुख देशांना नैसर्गिक आपत्ती किंवा युद्ध यांचा सामना करावा लागेल. खेळाडूंसाठी प्रतिकूल असून खेळाडूंचे अपघात, तसेच ज्येष्ठ खेळाडूंचा मृत्यू होण्याचा संभव असल्याची शक्यता ‘ज्योतिष ज्ञान’ या त्रैमासिकात ज्योतिषी सिद्धेश्वर मारटकर यांच्याकडून वर्तवण्यात आली आहे. पूर्ण वर्षाचे पंचांग हे वर्षभरापूर्वीच प्रसिद्ध केले जाते.
यांनी या भाकितांमध्ये म्हटले आहे की,
१. सप्तमातील राहू – हर्षल योग आणि अष्टमातील मंगळ युद्धस्थिती निर्माण करणारे असून सीमेवरील तणाव वाढेल. चीन आणि पाकिस्तानकडून सीमारेषेजवळ कुरापती वाढतील. जगभरातील प्रमुख देशांना नैसर्गिक आपत्ती किंवा युद्धाचा सामना करावा लागेल. पश्चिमेकडील देशात युक्रेन-रशिया युद्धाचे पडसाद उमटतील. गुजरात, मुंबई, गोवा आणि देहली या प्रदेशांना भूकंप किंवा वादळे किंवा आतंकवादी कारवाया यांचा धोका संभवतो.
२. खेळाडू आणि तरुण वर्ग यांच्यासाठी हा काळ प्रतिकूल राहील. मोठ्या खेळाडूंचे अपघात, घातपात किंवा दुखापतीच्या घटना घडतील. या काळात ज्येष्ठ खेळाडूंचा मृत्यू संभवतो.
३. एकूण ग्रहस्थितीचा विचार करता जानेवारी-फेब्रुवारी मासात तापमानात मोठी वाढ झाल्याने हवामानात विचित्र पालट होतील.
(३० डिसेंबर या दिवशी ज्येष्ठ फुटबॉलपटू पेले यांचे निधन झाले, तर त्याच दिवशी भारतीय क्रिकेटपटू रिषभ पंत हे चारचाकी अपघातात गंभीररित्या घायाळ झाले. याखेरीज नेपाळला भूकंप, तर अमेरिकेला बर्फाच्या वादळासारख्या नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागला. ‘येणार्या आपत्काळात जगात अधिकाधिक नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्ती येतच रहाणार आहेत’, असे द्रष्टे आणि संत यांनी सांगून ठेवले आहे. संपूर्ण जग सध्याचा याचा अनुभव घेत आहे. यावरून ज्योतिषशास्त्राची महानता आणि संतांचा द्रष्टेपणा लक्षात येतो ! – संपादक)