भाषेतील काही शब्द लिहिण्याची पद्धत आणि त्यामागील कारणे
सनातनचे संस्कृतवर आधारलेले नाविन्यपूर्ण मराठी व्याकरण !
‘संस्कृत भाषेपासून मराठी, हिंदी, गुजराती आदी भाषांची निर्मिती झाली. या संस्कृतोद्भव भाषांच्या व्याकरणाचा पाया साहजिकच भाषाजननी संस्कृतचे व्याकरण हाच राहिला. परिणामी या भाषांचे व्याकरण शिकण्यासाठी संस्कृतचे व्याकरण ठाऊक असणे अनिवार्य बनले. आधुनिक काळात इंग्रजीच्या आक्रमणामुळे नव्या पिढीला संस्कृतवर आधारित स्वभाषेचे व्याकरण शिकणे अवघड बनले. या पाश्र्वभूमीवर या लेखमालेमध्ये मराठीची स्वायत्तता आणि तिचे संस्कृतशी असलेले आध्यात्मिक नाते जपत व्याकरणाचे नियम मांडण्यात आले आहेत.
१६.१२.२०२२ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘वहाणे’, ‘पहाणे’ आणि ‘रहाणे’ या शब्दांविषयी माहिती पाहिली. आजच्या लेखात आणखी काही शब्दांच्या व्याकरणाविषयी जाणून घेऊ. (लेखांक १६ – भाग ५)
(टीप : या विषयातील ‘२ अ’ ते ‘२ क ४’ ही सूत्रे दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेल्या लेखांमध्ये देण्यात आली आहेत.)
२ ख. ‘हत्या’ या शब्दातील ‘त्या’ हे जोडाक्षर उच्चारानुसार ‘त्त्या’ याप्रमाणे न लिहिण्याची कारणे
२ ख १. ‘हत्या’ हा तत्सम (संस्कृतमधून जसाच्या तसा मराठीत आलेला) शब्द आहे.
२ ख २. संस्कृत व्याकरणामध्ये जोडाक्षरांच्या उच्चारांच्या संदर्भात सांगितलेला नियम : जेव्हा एखाद्या शब्दातील जोडाक्षराच्या आधीचे अक्षर ‘अ’, ‘इ’, ‘उ’, ‘ऋ’ किंवा ‘लृ’ हे र्हस्व स्वर अंतर्भूत असलेले असते, तेव्हा त्या शब्दाचा उच्चार करतांना ते अक्षर आपण नेहमीची र्हस्व अक्षरे उच्चारतांना जेवढ्या वेळात उच्चारतो, त्यापेक्षा अल्प वेळात उच्चारावे. ‘शक्य’ या शब्दामध्ये ‘क्य’ या जोडाक्षराच्या आधीचे ‘श’ हे अक्षर ‘अ’ स्वरयुक्त आहे. ‘अ’ हा र्हस्व स्वर आहे. त्यामुळे ‘शक्य’ या शब्दाचा उच्चार करतांना आपण एरव्ही ‘श’ हे अक्षर जेवढ्या वेळात उच्चारतो, त्यापेक्षा अल्प वेळात उच्चारावे.
२ ख ३. वरील नियमानुसार उच्चार करतांना जोडाक्षरातील पहिल्या अक्षराचे ‘द्वित्व (एकच अक्षर दोन वेळा आणि जोडून लिहिणे, उदा. क्क, च्च, प्प इत्यादी)’ झाल्याप्रमाणे वाटणे; परंतु ते तसे नसणे : ‘हत्या’ या शब्दामध्ये ‘त्या’ या जोडाक्षराच्या आधी ‘ह’ हे ‘अ’ हा र्हस्व स्वर अंतर्भूत असलेले अक्षर आले आहे. त्यामुळे सूत्र क्र. ‘२ ख २’मध्ये दिलेल्या नियमानुसार ते उच्चारतांना नेहमीपेक्षा अल्प वेळेत उच्चारले जाते. परिणामी पुढील ‘त्या’ या जोडाक्षरावर जोर येतो आणि ‘हत्या’ हा शब्द ‘हत्त्या’ असा उच्चारला जात आहे कि काय ?’, असा प्रश्न पडतो; परंतु तो केवळ आभास आहे. ‘हत्या’ या शब्दातील ‘ह’ र्हस्व स्वरांत असल्यामुळे तो निर्माण झालेला आहे. त्यामुळे या शब्दातील ‘त्’ हा ‘त्त्’ असा न लिहिता ‘त्’ असा एकेरी लिहिणे योग्य आहे. यानुसार हा शब्द ‘हत्या’ असा सिद्ध होतो. या नियमाची आणखी काही उदाहरणे पुढे दिली आहेत.
अगत्य, एक्याऐंशी, सत्य, नित्य, पुण्य, कृत्य, मृत्यू इत्यादी.
२ ग. ‘पिंडी’ आणि ‘पिंड’ या शब्दांचे अर्थ लक्षात घेऊन त्यांचा वापर करणे आवश्यक असणे : ‘पिंडी’ हा शब्द ‘शिवलिंगा’शी संबंधित आहे. शिवलिंगाला ‘शिवाची पिंडी’ असे म्हणतात, तर श्राद्धविधीच्या वेळी भातापासून जे बनवले जातात, त्यांना ‘पिंड’ असे संबोधतात. सध्या ‘पिंडी’ आणि ‘पिंड’ हे शब्द बर्याच जणांकडून अयोग्य ठिकाणी वापरले जातात. यासाठी हे अर्थ लक्षात घेऊन ते वापरणे सयुक्तिक ठरेल.
२ घ. ‘अध्यक्ष’ या पुल्लिंगी शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ‘अध्यक्षा’ असे होणे; मात्र ‘डॉक्टर’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ‘डॉक्टरा’ असे न होता ‘डॉक्टरीण’ असे होत असणे : ‘अध्यक्ष’ या पुल्लिंगी शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ‘अध्यक्षा’, ‘नेता’ याचे स्त्रीलिंगी रूप ‘नेत्या’, ‘शिक्षक’चे ‘शिक्षिका’, तर ‘वक्ता’चे ‘वक्त्या’ असे होते; मात्र ‘डॉक्टर’चे स्त्रीलिंगी रूप ‘डॉक्टरा’ किंवा ‘वकील’चे ‘वकिला’ असे होत नाही. ही रूपे अनुक्रमे ‘डॉक्टरीण’ आणि ‘वकिलीण’ अशी होतात. याचे कारण असे की, ‘अध्यक्ष’, ‘शिक्षक’, ‘नेता’ आणि ‘वक्ता’ हे शब्द संस्कृतमधून मराठी भाषेत आले आहेत. संस्कृत भाषेमध्ये ‘कोणत्या पुल्लिंगी शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कसे असावे ?’, यासंबंधी अत्यंत काटेकोर नियम आहेत. त्यांच्यानुसार या शब्दांची रूपे ठरली आहेत; परंतु ‘डॉक्टर’ किंवा ‘वकील’ हे शब्द परभाषांतून मराठीत आले आहेत. त्यामुळे त्यांना संस्कृत भाषेतील व्याकरणाचे नियम लागत नाहीत. त्याऐवजी मराठी भाषेतील नियम लागतात. मराठी भाषेत ‘शिंपी’, ‘सुतार’, ‘लोहार’ असे संबंधित व्यक्तींचा व्यवसाय दर्शवणारे जे शब्द आहेत, त्यांची स्त्रीलिंगी रूपे अनुक्रमे ‘शिंपीण’, ‘सुतारीण’, ‘लोहारीण’ अशी होतात. येथे मूळ शब्दांना ‘ईण’ हा प्रत्यय लागतो. ‘डॉक्टर’ आणि ‘वकील’ हेदेखील व्यवसाय दर्शवणारे शब्द आहेत. त्यामुळे त्यांची स्त्रीलिंगी रूपेही ‘डॉक्टरीण’ आणि ‘वकिलीण’ अशी होतात. याची आणखी उदाहरणे पुढे दिली आहेत.
माळी – माळीण, कुंभार – कुंभारीण, पाटील – पाटलीण, खोत – खोतीण इत्यादी.’ (क्रमशः)
– सुश्री (कुमारी) सुप्रिया शरद नवरंगे, एम्.ए. (मराठी), बी.एड., सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२८.१२.२०२२)