चीनची ‘सुपर सोल्जर’ बनवण्याची योजना भारतासाठी धोकादायक !
चीन आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने त्यांच्या सैनिकांच्या ‘डी.एन्.ए.’मध्ये (अनुवांशिक गुणधर्मामध्ये) फेरफार करून ‘सुपर सोल्जर’ (सर्वसामान्य मानवी क्षमतांच्या पलीकडे कार्य करण्यास सक्षम असलेला सैनिक) बनवत आहे, अशा प्रकारचा दावा अमेरिका आणि ब्रिटन यांनी नुकताच केला आहे. ‘सुपर सोल्जर’मुळे चिनी सैनिक न झोपता आणि न खातापिता लढू शकतील. या वृत्ताला अनेक शास्त्रज्ञांनीही दुजोरा दिला आहे. काही वर्र्षांंपूर्वी शास्त्रज्ञांनी ‘सुपर सोल्जर’ बनवण्याचे एक तंत्रज्ञान शोधले होते. या पद्धतीत सैनिकांच्या ‘डी.एन्.ए.’मध्ये फेरफार केला जातो. त्यामुळे ‘सुपर सोल्जर’ बनवण्यात साहाय्य मिळते. याचा चीनचा काय लाभ होईल ? आणि ते थांबवण्यासाठी आपण काय करायला पाहिजे ? या सर्वांचे विश्लेषण करणे आवश्यक आहे.
१. युद्ध जिंकण्यासाठी चीनने ‘सुपर सोल्जर’ बनवण्याचा प्रयत्न करणे
भारत-चीन सीमा ही अतीउंच भागात आहे. या भागात सैनिकांची शारीरिक क्षमता अगदी अल्प होते. तेथे शून्याखाली तापमान असून ऑक्सिजनची कमतरता असते. सामान्यपणे असे समजले जाते की, सैनिकांच्या वजनाच्या अध्र्या वजनाएवढे साहित्य त्यांनी पाठीवर वाहून न्यायला पाहिजे. एका सैनिकाचे वजन सरासरी ६० ते ६५ किलो धरले, तर त्याला ३० ते ३५ किलो एवढे युद्धसाहित्य पाठीवर घेऊन जाता आले पाहिजे. त्यात त्याची बंदूक, दारूगोळा, जेवण, युद्धासाठी लागणारे हातबाँब इत्यादींचा समावेश असतो.
समुद्रसपाटीवर एक सैनिक त्याच्या पाठीवर ३५ किलो साहित्य घेऊन जात असेल, तर अतीउंच भागात त्याची ५ ते १० किलो किंवा त्याहूनही अल्प साहित्य घेऊन जाण्याएवढी क्षमता न्यून होते. एवढेच नव्हे, तर या वातावरणात सैनिक लवकर आजारी पडतात. त्यांना सर्दी, खोकला, उच्च रक्तदाब, हृदयरोग इत्यादी आजार होण्याची शक्यता असते. अती थंड हवामानामुळे त्यांचे आयुष्यही न्यून होते. लढाईच्या वेळी सैनिकांची क्षमता वाढवण्यासाठी त्यांना ‘सुपर सोल्जर’ बनवले, तर निश्चितच युद्ध जिंकण्यासाठी साहाय्य मिळू शकते. हे लक्षात घेऊन चीन सर्व सैनिकांचे ‘डी.एन्.ए.’ गोळा करत आहे आणि त्यात फेरफार करून तो त्यांना ‘सुपर सोल्जर’ बनवत आहे.
इमॅन्युएल शार्पेटिए आणि जेनिफर डॉडना या फ्रेंच महिला शास्त्रज्ञांनी वर्ष २०१२ मध्ये ‘क्रिशपर’ हे तंत्रज्ञान शोधून काढले. ‘साधारण २ वर्षांपूर्वी चीनने या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ‘सुपर सोल्जर’ बनवण्यास प्रारंभ केला. यासाठी चीनने त्यांच्या सैनिकांचे ‘डी.एन्.ए.’ नमुने घेतले आहेत’, अशी माहिती अमेरिकेच्या गुप्तचर विभागाने दिली आहे. ‘सुपर सोल्जर’ हा त्याचाच भाग आहे, असे ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ या वृत्तपत्रात अमेरिकेच्या गुप्तचर विभागाचे तत्कालीन संचालक जॉन रॅटक्लिप यांनी लिहिले आहे.
२. काही खेळाडूंनी स्टिरॉईड आणि अमली पदार्थ यांचे सेवन करून असामान्य कामगिरी करणे
चीन ‘सुपर सोल्जर’ बनवत असल्याच्या बातम्या गलवान संघर्षानंतरही आल्या होत्या. चिनी सैनिक शहरी भागातून आलेले आहेत. त्यामुळे ते अती थंड वातावरणात रहाण्यास सिद्ध नाहीत. ‘असे सैनिक खरोखरच ‘सुपर सोल्जर’ बनू शकतात का ?’, असा प्रश्न आपणाला पडेल; पण अशा स्वरूपाचे प्रयोग नेहमीच चालू असतात. यापूर्वी सुपर खेळाडू बनलेले आहेत, उदा. ग्रिफीथ जॉयनर नावाच्या महिलेने ऑलिंपिकमध्ये दोन वेळा सुवर्णपदक मिळवले होते. ती १०० मीटर अंतर १० सेकंदांहून अल्प वेळेत पार करणारी पहिली महिला ठरली होती. महिलांना हे कधीही करता आले नाही, ते तिने कसे साध्य केले, याचे सर्वांनाच आश्चर्य वाटले होते. त्यामुळे तिने स्टिरॉईड्स आणि अमली पदार्थ घेतल्याच्या अनेक शंका समोर आल्या होत्या. ४ वर्षांनी या सर्व शंका सत्य ठरल्या. तिने विविध प्रकारचे अमली पदार्थ घेतल्याने तिला चांगली कामगिरी करता आली होती; पण चारच वर्षांत तिचा मृत्यू झाला. आपल्यापैकी काही जण जागतिक स्तरावरील ‘डब्ल्यू.डब्ल्यू.एफ्.’च्या कुस्त्या पहात असतील. त्यात महाकाय पैलवान हे एकमेकांना प्रचंड मारपीट करत असतात, तरीही त्यांना काही होत नाही. त्यांनाही ‘स्टिरॉईड्स’ दिले जातात. बहुतेकांचा मृत्यू हा अतिशय लवकर होतो.
३. असामान्य तंत्रज्ञान शोधण्याच्या चीनच्या प्रयत्नांवर बंदी घालणे आवश्यक !
जगात शास्त्रज्ञांचे सतत संशोधन चालू असते. त्यात ‘कुठलेही असामान्य तंत्रज्ञान शोधायचे नाही’, असा नियम करण्यात आला आहे. आपण औषधासाठी संशोधन करू शकतो; परंतु मानवाच्या ‘जीन्स’मध्ये संशोधन करून त्यांना ‘सुपर’ मानव बनवण्याच्या संशोधनावर जगाने बंदी घातली आहे. चीनला महाशक्ती बनण्याची एवढी घाई झाली आहे की, ते त्यासाठी काहीही करू शकतात. त्यामुळेच जगात कोरोना किंवा चिनी विषाणू पसरला होता आणि ते चीनने बनवलेले जैविक शस्त्र होते. ते त्यांच्या वुहानमधील प्रयोगशाळेतून निसटले आणि जगभर हाहाःकार माजला. या चिनी विषाणूमुळे ८ लाख भारतियांचा मृत्यू झाला. चिनी भस्मासुर थांबण्याचे नावच घेत नाही. या विषाणूमुळे तेथील लोकांचेही मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. निसर्गाच्या विरोधात प्रयोग करणे, हे मानवजातीसाठी धोकादायक असते.
४. राक्षसी महत्त्वाकांक्षा असणार्या चीनवर दबाव टाकणे आवश्यक !
अशाच प्रकारे चीन ‘सुपर सोल्जर’ बनवण्याचे संशोधन करत आहे, हे चिनी सैनिकांना समजले पाहिजे. त्यांचे कुटुंबीय, तसेच माजी चिनी सैनिक यांनाही चीनचे हे कृत्य समजले पाहिजे. अशा प्रकारचे संशोधन संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्क आयोगाने थांबवावे, यासाठी चीनवर दबाव टाकला पाहिजे. चीनची महत्त्वाकांक्षा राक्षसी असल्याने तो अशा दबावामुळे थांबेल, याची शक्यता पुष्कळ अल्प आहे. त्यामुळे या संशोधनाविषयी चिनी लोकांना जागरूक करणे एवढेच आपल्या हातात आहे. एक राष्ट्र म्हणून आपण तेच विविध स्तरांवर करत रहावे.’
– (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन, पुणे.
संपादकीय भूमिकाअसामान्य तंत्रज्ञान न शोधण्याचा नियम असतांनाही चीन करत असलेले चुकीचे कृत्य रोखण्यासाठी भारताने दबाव आणायला हवा ! |