भारतीय संस्कृतीचे संरक्षण आणि संवर्धन करणे, हे प्रत्येक भारतियाचे आद्यकर्तव्य !
अन्य संस्कृतींच्या तुलनेत भारतीय संस्कृती सरसच !भारतीय संस्कृतीतील प्रत्येक विचार जीवनमूल्य आहेत. ती जीवनात अंगीकारून मनुष्यजातीचा सामूहिक विकास होऊ शकतो. हाच ‘सर्वे भवन्तु सुखिनः ।’, म्हणजे ‘सर्व जण सुखी होवोत’ यातील भाव आहे. अनादि काळापासून आलेली ही हिंदु संस्कृती सतत प्रवाहित आहे. त्यामुळे ती नित्य अद्वितीय आहे. तिच्यातील उदारता आणि सर्वसमावेशकता या गुणांमुळे तिने अन्य संस्कृतीतील उच्च तत्त्वांना झिडकारले नाही अन् आपल्या मूळ संस्कारांना सोडले नाही. त्यामुळे सर्वांगीणता, विशालता, उदारता आणि सहिष्णुतेच्या दृष्टीने अन्य संस्कृतीच्या तुलनेत भारतीय संस्कृती सरस ठरते. त्यामुळे तिचे संरक्षण आणि संवर्धन करणे, या काळात अतिशय महत्त्वाचे अन् या देशात रहाण्यार्या प्रत्येक व्यक्तीचे आद्यकर्तव्य ठरते. – डॉ. श्रीधर म. देशमुख, पाथर्डी, नगर |
१. पूर्वजांनी सांगितलेली संस्कृती आणि संस्कार यांकडे वळण्याची आवश्यकता
‘आपण अनादि काळापासून चालत आलेली, वैज्ञानिक कसोट्यांच्या निकषांवर पूर्णपणे उतरलेली, रज-तमापासून मुक्त असलेली, तसेच पूर्वजांनी सांगितलेली संस्कृती अन् संस्कार विसरून केवळ ‘फॅशन’ म्हणून अनेक चुकीच्या गोष्टी स्वीकारण्याचा प्रमाद केला आहे. अल्पावधीतच या चुकीच्या गोष्टी आपल्या जीवनाचा भाग बनल्या आहेत. त्यामुळे आताच्या काळात या सर्व गोष्टी सोडून देऊन आपण पुन्हा जाणीवपूर्वक आपले संस्कार आणि संस्कृती यांच्याकडे वळायला हवे.
२. सूर्याेदयापूर्वी उठणे, व्यायाम करणे, पालकांना नमस्कार करणे आणि उपयुक्त आहार घेणे
सूर्याेदयापूर्वी उठून व्यायाम, अभ्यंग, सूर्य नमस्कार, प्राणायाम, देवपूजा, वडीलधार्या मंडळींना नमस्कार इत्यादी करून मगच न्याहरी किंवा जेवण यांकडे वळावे. न्याहरीत गायीचे दूध, काजू, बदाम, अक्रोड, काळ्या मनुका, पिस्ता, अंजिर यांसारखी शरीर बल्य आणि व्याधीक्षमत्व वाढवणारी नैसर्गिक फळे असावीत. जेवण करतांना वरणभात, तूप, लिंबू, डाळी, मोड आलेली कडधान्य आणि हिरव्या पालेभाज्या यांचा वापर असावा. प्रतिदिनच्या आहारात शतावरी, अश्वगंधा, गुळवेल, लवंग, दालचिनी, विलायची, मिरे, तेजपत्ता आणि आले, या वनस्पती अन् मसाल्याचे पदार्थ यांचा वापर असावा.
३. आयुर्वेदात सांगितलेल्या सद्वृत्तीचे पालन करणे
आयुर्वेदात सांगितलेल्या सद्वृत्तीचे पालन करावे, म्हणजेच बाहेरून जाऊन आल्यानंतर हात कोपरापर्यंत आणि पाय गुडघ्यापर्यंत व्यवस्थित धुवावेत. शौचविधी आणि मूत्र विसर्जनंतरही अशाच प्रकारे हात आणि पाय धुऊन गुळण्या कराव्यात. त्यामुळे शरीर अन् मन यांची शुद्धी होते. एखाद्या मृत व्यक्तीचा शरीरस्पर्श किंवा स्मशानातून जाऊन आल्यानंतर अंगावरील कपड्यांसह स्नान केल्यानंतर शुद्धी सांगितली आहे. आपल्या या शरीर आणि मन शुद्धीच्या पद्धतीचे महत्त्व सध्याच्या काळात सिद्ध होत आहे.
४. कुलधर्म आणि कुलाचार यांचे पालन करणे
कुलधर्म आणि कुलाचार यांच्या वेळी जेव्हा आपल्याकडे घरातील मंडळींसह आसपासचे लोक जेवायला येत असत, तेव्हा सोवळ्यात स्वयंपाक केला जात असे. अर्थात् त्यासाठी सोवळ्यासाठी वापरायची वस्त्रे आदल्या रात्री स्वच्छ पाण्याने धुऊन जिथे कुणाचाही संपर्क येणार नाही, अशा खोलीत वाळत घालत असत. प्रत्यक्ष कुलधर्म-कुलाचाराच्या दिवशी सर्व गोष्टींचे पालन केले जात असे.
५. ग्रहणाचे नियम पाळणे
सूर्य आणि चंद्र ग्रहणाच्या वेधकाळातील वातावरणात सहज रितीने जंतूसंसर्ग वाढत असल्याचे आधुनिक विज्ञानाने सिद्ध केले आहे. त्यानुसार वेध लागल्यानंतर आणि ग्रहणमोक्षानंतर स्नानविधी सांगितला आहे, त्याचे पालन करावे.
६. सणांच्या वेळी घराची स्वच्छता करणे
घर आणि अंगण सारवण्यासाठी गायीच्या शेणाचा वापर केल्यानेही सूक्ष्म जंतूंचा नाश होत असल्याचे सिद्ध झाले आहे. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दीपावली इत्यादी सणांच्या वेळी घराचा कोपरान्कोपरा झाडून स्वच्छ केला जात असे, तसेच घरातील भिंतीना चुना लावण्याची पद्धत होती. त्यामुळे संपूर्ण घराचेच निर्जुंतुकीकरण व्हायचे. आजच्या काळात एकदा रंग दिल्यानंतर माणसाच्या आळसामुळे घर स्वच्छ करणे टाळले जाते. यामुळे वारंवार व्याधी संसर्ग वाढण्याचे प्रमाण वाढले आहे. घरातील कोपर्यांत कोळी, जाळे, किडे, मुंग्या अथवा अन्य कीटक यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.
७. धूतवस्त्रे परिधान करणे
आपल्याकडे प्रतिदिन धूतवस्त्र परिधान करण्याला फार महत्त्व दिलेले आहे; पण आज-काल आपण पाश्चात्त्यांच्या अंधानुकरणामुळे ८-८ दिवस तेच कपडे परिधान करून त्वचारोग अन् इतर संसर्ग यांसाठी द्वार खुले करून देत आहोत.
८. चरक संहितेनुसार पाळावयाचे यम-नियम
कुष्ठ, ज्वर किंवा डोळे येणे, यांसारखे संसर्ग व्याधी पसरण्याची कारणे सांगतांना परस्परांची शरीर गात्रे कुठल्याही कारणाने संपर्कात येणे, श्वासोच्छ्वास, एकत्र भोजन, एकाच शय्येवर झोपणे, एकमेकांची वस्त्रे, माला, कपडे, गंधादी अनुलेपनाची साधने वापरल्याने संसर्ग व्याधी एका व्यक्तीकडून दुसर्या व्यक्तीकडे पसरतात. त्यासाठी एकमेकांचे कपडे किंवा इतरांची अन्य साधने वापरू नयेत. त्याचप्रमाणे परिचित व्यक्ती भेटल्यानंतर हात मिळवण्याऐवजी दोन हात जोडून ‘रामराम’, ‘नमस्कार’ म्हणत. तसेच नमस्कार करण्याची प्रथाही अतीप्राचीन आहे.
चरकसंहिता या ग्रंथातील जनपदोध्वंस या प्रकरणात महर्षि चरकाचार्य यांनी ‘जनपदोध्वंसा’ची वायू, जल, देश आणि काल ही बलवान अशी कारणे सांगितली असून कालदृष्टी ही सर्वांत कठीण सांगितली आहे. त्यामुळे कोरोनासारखे दुर्धर संसर्ग पसरतात. त्यावर उपाय म्हणून ‘व्याधीक्षमत्व वाढीसाठी विविध रसायनांचे सेवन, ब्रह्मचर्यपालन, सत्यभाषण, प्राणीमात्रांविषयी दया, तसेच मानसिक बल वाढवण्यासाठी देवपूजा, कथा श्रवण, संतसंगती आणि सद्वृत्तीचे पालन करावे’, असा उपदेश आहे. चरक संहितेतील हा उपदेश विशेषत्वाने समजून घेतल्यास ‘कोरोना’ या व्याधीचा प्रतिकार करणे सोपे होईल. आयुर्वेदातील ‘नस्य’ आणि ‘गंडूष कवलधारण’ योगातील ‘जलनेती’ या क्रियाही उपयुक्त आहेत. होम-हवनात वापरली जाणारी पिंपळ, औदुंबर, वड, पळस, शुद्ध गायीचे तूप, अन्य हवन सामग्री पाहिली, तर या वनस्पतींच्या धुरामुळे वातावरणाचे निर्जुंतुकीकरण होऊन शुद्धी होत असल्याचे सिद्ध झाले आहे. देवपूजा झाल्यानंतर कापूर आरतीत वापरल्या जाणार्या भीमसेनी कापराच्या धुरापासून सूक्ष्म विषाणूंचा नाश होत असल्याचेही सिद्ध झाले आहे. होळीसारख्या सणांमधून रानशेणी गोवर्या, विविध औषधी वनस्पतींच्या ज्वलनातून वातावरणाची शुद्धी होते. त्याचप्रमाणे मंदिरातील मोठ्या घंटा, देवघरातील छोट्या घंटा, पूजेमध्ये वाजवले जाणारे शंख आणि यज्ञकर्त्यांकडून एका सुरात केले जाणारे उच्चार, या सर्वांच्या कंपनध्वनीमधूनही वातावरणाची शुद्धी होते.’
– डॉ. श्रीधर म. देशमुख, पाथर्डी, नगर
(साभार – मासिक ‘स्वयंभू’, दिवाळी अंक २०२०)