राज्य संरक्षित स्मारकांवरील अतिक्रमणे त्वरित हटवा ! – हिंदु जनजागृती समिती
जिल्हाधिकारी, स्थानिक नगरपालिका अतिक्रमणांविषयी गप्प का ? – हिंदु विधीज्ञ परिषदेचा प्रश्न
संभाजीनगर, ३० डिसेंबर (वार्ता.) – हिंदु विधीज्ञ परिषदेने ‘राज्य संरक्षित स्मारकां’च्या संदर्भात माहितीच्या अधिकारात काही प्रश्न विचारले होते. त्याच्या उत्तरांमध्ये धक्कादायक माहिती उघड झाली आहे. या संदर्भात पुरातत्व विभागाच्या साहाय्यक संचालकांकडून माहितीच्या अधिकारात प्राप्त झालेल्या माहितीनुसार संभाजीनगर येथील ३३ राज्य संरक्षित स्मारकांवर अतिक्रमण झाले आहे, असे या विभागाने लेखी स्वरूपात उत्तर दिले आहे. याविषयी पुरातत्व विभागाने स्थानिक प्रशासन, पोलीस प्रशासन, जिल्हाधिकारी कार्यालय यांनाही याविषयी कळवले असून वक्फ बोर्डासह सर्व अतिक्रमण करणार्यांना नोटीस बजावल्याचाही उल्लेख या उत्तरामध्ये केलेला आहे; मात्र जिल्हाधिकार्यांकडून अद्याप या अतिक्रमणांच्या संदर्भात कोणतीही कारवाई केलेली नाही. राज्य संरक्षित स्मारकांवर अतिक्रमणे होईपर्यंत पुरातत्व विभाग झोपा काढत होता का ? आणि पुरातत्व विभागाने प्रशासनाला या अतिक्रमणाविषयी कळवूनही जिल्हाधिकारी आणि स्थानिक नगरपालिकेचे अधिकारी काय करत होते ? असा प्रश्न करत राज्य संरक्षित स्मारकांवर झालेली अतिक्रमणे त्वरित हटवावीत, या संदर्भात आम्ही मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असून जर जिल्हाधिकार्यांनी या संदर्भात काही कारवाई केली नाही, तर आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल, अशी चेतावणीही हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी दिली आहे. या अतिक्रमणांच्या संदर्भात हिंदु जनजागृती समिती आणि हिंदु विधीज्ञ परिषद यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी हिंदु विधीज्ञ परिषदेचे संस्थापक सदस्य पू. सुरेश कुलकर्णी, हिंदु जनजागृती समितीच्या संभाजीनगर समन्वयक कु. प्रियांका लोणे याही उपस्थित होत्या.
हिंदु विधीज्ञ परिषदेचे पू. सुरेश कुलकर्णी म्हणाले की, राज्य संरक्षित स्मारकांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. याला पुरातत्व विभाग उत्तरदायी आहे. जर राज्य संरक्षित स्मारकांवर कुणीही अतिक्रमण करत असेल, तर राज्यात शासन-प्रशासनाचे काही अधिकार शिल्लक आहेत कि नाहीत ? अतिक्रमणकर्ते एवढे मुजोर झाले आहेत की, त्यांना शासन-प्रशासनाचा धाक राहिलेला नाही. या सर्व शासकीय विभागांची सद्यस्थिती म्हणजे ‘आंधळं दळतंय आणि कुत्र पीठ खातंय’, अशी झाली आहे.
या पत्रकार परिषदेत हिंदु जनजागृती समिती आणि हिंदु विधीज्ञ परिषद यांनी पुढील मागण्याही केल्या.
१. राज्य संरक्षित स्मारकांमध्ये अनधिकृत बांधकाम करणार्यांवर जिल्हाधिकार्यांनी कठोर कारवाई करण्यात यावी.
२. राज्य संरक्षित स्मारकांमध्ये केलेले अनधिकृत बांधकाम अथवा अतिक्रमण जिल्हाधिकार्यांनी त्वरित भूईसपाट करावे.
३. या अतिक्रमणांसाठी उत्तरदायी पुरातत्व विभागातील अधिकारी अथवा अन्य संबंधित अधिकारी यांची चौकशी करून त्यांच्यावरही कारवाई करावी.
४. ज्या राज्य संरक्षित स्मारकांवर अतिक्रमण झाले आहे, ती स्मारके त्वरित पुरातत्व विभागाने कह्यात घ्यावीत.
ऐतिहासिक स्मारकांवरील अवैध अतिक्रमणे ही प्रशासनाच्या कारभाराविषयी संशय निर्माण करणारी ! |