हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांचा मिळालेला अनमोल सत्संग आणि त्यांची कृती, साधनेचे दृष्टीकोन अन् प्रीती यांतून श्री. विश्वनाथ कुलकर्णी यांना शिकायला मिळालेली सूत्रे
‘मी पूर्णवेळ साधना करण्यास आरंभ केल्यावर वाराणसी आश्रमात रहायला आलो. मागील ५ वर्षांपासून उत्तरप्रदेश राज्यात सेवा करतांना मला हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांच्या समवेत रहायची संधी मिळाली. त्या कालावधीत मला त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे पुढे दिली आहेत.
१. वाराणसी आश्रमात आल्यावर सद्गुरु नीलेशदादांच्या कक्षात रहायला मिळणे आणि त्यांच्याकडून ‘आश्रमाप्रती भाव कसा असावा ?’, हे शिकायला मिळणे
गुरुकृपेने वाराणसी आश्रमात मला २ वर्षे सद्गुरु नीलेशदादांच्या कक्षात रहाण्याचे सौभाग्य मिळाले. एकदा मी खोलीतील भिंतीला डोके टेकून नामजप केला. त्या वेळी माझ्या केसांना लावलेल्या तेलामुळे भिंतीवर डाग पडले. सद्गुरु नीलेशदादांनी ही चूक माझ्या लक्षात आणून दिली आणि भिंतीला डोके टेकण्यापूर्वी डोक्यामागे रुमाल ठेवण्यास सांगितले. त्या वेळी ‘सद्गुरु दादा प्रत्येक वेळी स्वतः रुमाल ठेवूनच भिंतीला डोके टेकवतात. त्यामुळे ते रहात असलेल्या खोलीच्या भिंतीवर तेलाचे डाग नाहीत’, हे माझ्या लक्षात आले. यातून मला ‘सद्गुरु नीलेशदादांचा आश्रमाप्रती भाव कसा आहे आणि मी कसा कृतज्ञताभाव ठेवायला हवा ?’, हे शिकायला मिळाले.
२. नीटनेटकेपणा
सद्गुरु दादांच्या खोलीतील प्रत्येक वस्तू त्या त्या जागेवर व्यवस्थित ठेवलेली असते. पटलावर लेखणी जरी ठेवली असेल, तर तीही सरळ असते.
३. ‘प्रत्येक कृती परिपूर्ण आणि देवाला अपेक्षित अशा प्रकारे करायला हवी’, याची सद्गुरु नीलेशदादांनी कृतीतून करून दिलेली जाणीव !
एकदा मी काही कागदांचे हाताने तुकडे करून ते स्नानगृहातील जाळीवरील केस उचलण्यासाठी ठेवले. ‘जाळीवरील केस काढायचे आहेत, तर कागद हाताने फाडले, तरी चालतील’, असा माझा विचार होता. नंतर सद्गुरु दादांनी ‘कागदांचे तुकडे करतांना ते कात्रीने अचूक आयताकृती कापून ठेवले, तर त्यातून चांगली स्पंदने येतात’, हे मला प्रत्यक्ष दाखवले. यातून ‘प्रत्येक कृती करतांना ती परिपूर्ण आणि देवाला अपेक्षित अशा प्रकारे कशी करायला पाहिजे ?’, हे माझ्या लक्षात आले.
४. अहंभावामुळे साधकाला परिस्थिती स्वीकारणे अवघड वाटत असतांना सद्गुरु नीलेशदादांनी दिलेल्या साधनेच्या दृष्टीकोनामुळे योग्य कृती करण्याची दिशा मिळणे
माझ्यातील अहंभावामुळे प्रतिकूल परिस्थितीशी जुळवून घेतांना काही वेळा माझा संघर्ष होत असे. वाराणसी क्षेत्रात साधकसंख्या अल्प असल्याने तेथे धर्मप्रसाराच्या सर्व उपक्रमांचे आयोजन करता येत नसे. ही परिस्थिती स्वीकारणे मला अवघड जायचे. ‘इतरांच्या तुलनेत आपण काहीच केले नाही’, हे सूत्र बैठकीत कसे सांगायचे ?’, असे मला वाटायचे. त्यामुळे माझा संघर्ष व्हायचा. याविषयी मी सद्गुरु दादांना सांगितल्यावर त्यांनी मला ‘आपल्याकडून काही झाले नाही’, हेसुद्धा सहजतेने स्वीकारता आणि सांगता यायला हवे’, असा साधनेचा दृष्टीकोन दिला.
संघर्ष झाल्यावर मी ‘सद्गुरु नीलेशदादा या प्रसंगात कसे वागतील किंवा अशा प्रसंगांत त्यांचा दृष्टीकोन कसाअसेल ?’, याचे चिंतन करत असे. त्यामुळे ‘मला साधनेच्या दृष्टीने योग्य कृती कशी करायला हवी’, हे शिकायला मिळून माझ्यात स्थिरता येऊ लागली.
५. एका साधकाविषयी प्रतिक्रिया आल्यावर सद्गुरु नीलेशदादांनी त्या साधकाचे गुण पहायला सांगून ‘त्याला साहाय्य करायला हवे’, याची जाणीव करून देणे
एकदा एका साधकाकडून गंभीर चूक झाली होती. त्या वेळी माझ्या मनात त्या साधकाविषयी प्रतिक्रिया आली. ‘मी याविषयी सद्गुरु नीलेशदादांशी बोलल्यावर त्यांनी मला त्या साधकाचे गुण सांगितले आणि ‘त्याला कसे साहाय्य करायला हवे’, जेणेकरून त्याची प्रगती होईल’, या संदर्भातील सूत्रे सांगितली. यातून मला ‘कोणत्याही प्रसंगात साधकांप्रती कृतज्ञताभाव आणि आदरभाव कसा असायला हवा ?’, हे शिकायला मिळाले.’
– श्री. विश्वनाथ कुलकर्णी (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ४१ वर्षे), समन्वयक, हिंदु जनजागृती समिती, उत्तरप्रदेश आणि बिहार. (९.७.२०२२)