बेंजामिन नेतन्याहू इस्रायलचे सहाव्यांदा पंतप्रधान

बेंजामिन नेतन्याहू

जेरुसलेम – ७३ वर्षीय बेंजामिन नेतन्याहू हे इस्रायलचे सहाव्यांदा पंतप्रधान झाले आहेत. देशात ‘बीबी’ या नावाने सुप्रसिद्ध असणार्‍या नेतन्याहू यांनी गुरुवारी रात्री पद आणि गोपनीयता यांची शपथ घेतली. ‘टाइम्स ऑफ इस्रायल’च्या वृत्तानुसार बेंजामिन नेतन्याहू यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेले हे ६ घटकपक्षांचे आघाडी सरकार देशाच्या इतिहासातील आतापर्यंतचे सर्वांत प्रखर राष्ट्रवादी विचारांचे सरकार आहे. यामुळे भविष्यात पॅलेस्टाईनसोबत संघर्षाची स्थिती उद्भवण्याची भीती आहे.

१. पंतप्रधानपदाची शपथ घेतांना नेतन्याहू यांना संसदेत तीव्र घोषणाबाजीचा सामना करावा लागला. संसदेच्या बाहेरही त्यांच्या विरोधकांनी तीव्र निदर्शने केली. नेतन्याहू यांनी शपथ घेतल्यानंतर ते त्यांच्या जागेवर जात असताना माजी पंतप्रधान येर लॅपिड यांनी त्यांच्याशी हस्तांदोलन करणे टाळले.

२. इस्रायलच्या संसदेत १२० सदस्य आहेत. नेतन्याहू यांच्या आघाडीकडे ६३ खासदारांचे संख्याबळ आहे. नेतन्याहू यांना सरकार चालवतांना मोठी कसरत करावी लागणार आहे. त्यांना प्रत्येक महत्त्वाचा निर्णय घेतांना सहकारी पक्षांचे साहाय्य घ्यावे लागणार आहे. हे सर्वच पक्ष पॅलेस्टाईन आणि अरब विरोधी आहेत.

३. नेतन्याहू यांना बहुमताअभावी गतवर्षी त्यागपत्र द्यावे लागले  होते. त्यानंतर १ नोव्हेंबर २०२२ या दिवशी झालेल्या निवडणुकीत नेतन्याहू यांचा लिकूड पक्ष सर्वांत मोठा पक्ष म्हणून समोर आला होता; पण त्यांना बहुमताचा जादुई ६१ चा आकडा गाठण्यात अपयश आले होते. त्यामुळे त्यांना ६ घटक पक्षांच्या साहाय्याने सरकार स्थापन करावे लागले.