तक्रार करणारी महिला आणि तिचा पती यांच्यावरच पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद ! – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री
विधान परिषद लक्षवेधी…
|
नागपूर, ३० डिसेंबर (वार्ता.) – सोलापूर जिल्ह्यात एका लोकप्रतिनिधीकडून एका महिलेवर अत्याचार झाल्याची चुकीची तक्रार करण्यात आली आहे. त्या महिलेच्या तक्रारी वस्तूस्थितीला धरून नाहीत. चुकीती माहिती देणार्या व्यक्तीच्या विरोधात एकूण १८ तक्रारी प्रविष्ट आहेत. यामध्ये त्या महिलेच्या पतीविरुद्ध ८ गुन्हे नोंद आहेत. यामध्ये ४ राष्ट्रीयकृत बँकांना बनावट कागदपत्रे देऊन बँकांची फसवणूक केल्याचे गुन्हे पोलीस ठाण्यात नोंद आहेत, तसेच विनयभंग झाल्याची खोटी तक्रार महिलेने केली असल्याचे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे, अशी माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३० डिसेंबर या दिवशी विधान परिषदेत लक्षवेधीवर उत्तर देतांना दिली. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ही लक्षवेधी मांडली होती.
सोलापूर जिल्ह्यात एका लोकप्रतिनिधीकडून एका महिलेवर अत्याचार करण्यात आल्याची तक्रार आली. या तक्रारीची कोणतीही दखल घेतली जात नाही. सातत्याने तक्रारदार महिलेवर दबाव टाकण्यात येत आहे. सदर महिला व तिच्या कुटुंबियांना संरक्षण देऊन या प्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी करावी.
— Ambadas Danve (@iambadasdanve) December 30, 2022
सोलापूर जिल्ह्यात एका लोकप्रतिनिधीकडून एका महिलेवर अत्याचार आणि अन्याय करण्यात आल्याची तक्रार करण्यात आली. सदर तक्रारीची कोणतीही नोंद घेतली जात नाही. सातत्याने तक्रारदार महिलेवर दबाव टाकण्यात येत आहे. सदर महिला आणि तिच कुटुंबीय यांना संरक्षण देऊन या प्रकरणी सखोल चौकशी करावी, अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ३० डिसेंबर या दिवशी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडतांना केली. त्याला उत्तर देतांना ते बोलत होते.
फडणवीस म्हणाले की, महिलेने ज्या दिवशी लोकप्रतिनिधीने विनयभंगाचा आरोप केला आहे, त्या दिवशी ते लोकप्रतिनिधी देहली येथे होते. हे उच्च न्यायालयात सिद्ध झाले आहे. मुळात १९ गुन्हे नोंद असलेल्यांवर तडीपारची कारवाई का केली नाही ? यापूर्वीच्या सरकारने ते करायला हवे होते. आता ते दायित्व माझ्यावर आहे. या प्रकरणाची पुन्हा पडताळणी करून दोषींवर कारवाई केली जाईल.