लिपिक पदासाठी मंत्रालयात अधिकार्यांच्या दालनात बोगस मुलाखती, चौकशीचा आदेश !
नागपूर, ३० डिसेंबर (वार्ता.) – मंत्रालयात ‘लिपीक’ म्हणून नोकरी देण्याचे आमीष दाखवून मंत्रालयातील उपसचिवांच्या दालनात बोगस मुलाखती घेण्यात आल्याचे गंभीर सूत्र विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत उपस्थित केले. याप्रकरणी सखोल चौकशी करण्याचा आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
माहितीचे सूत्राच्या (पॉईंट ऑफ इर्न्फाेमेशन) अंतर्गत अजित पवार यांनी ३० डिसेंबर या दिवशी हे सूत्र सभागृहात उपस्थित केले. मंत्रालयात शिपाई आणि लिपिक म्हणून नोकरी देण्याचे आमिष दाखवून मंत्रालयातील सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिवांच्या दालनामध्ये काही खासगी व्यक्तींकडून या बोगस मुलाखती घेण्यात आल्या. यासाठी त्यांच्याकडून लाखो रुपये घेण्यात आल्याचे अजित पवार यांनी सभागृहाच्या लक्षात आणून दिले. यावर उत्तर देतांना देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘हे प्रकरण अतिशय गंभीर आहे. यामध्ये गुन्हा नोंद झाला आहे. यात अधिक कडक कारवाई करण्यात येईल. यामध्ये कुणी वरिष्ठ अधिकारी आहेत का ? याचे अन्वेषण करण्यात येईल.’’
संपादकीय भूमिकामुख्य प्रशासकीय केंद्राच्या ठिकाणी बोगस मुलाखती चालणे, ही सरकारची नाचक्की ! |