बोगस नावाने रोजगार हमी योजनेचे पैसे लाटणार्या धाराशीव जिल्ह्यातील अपहाराचे पुनर्अन्वेषण होणार !
तारांकित प्रश्न १
नागपूर, ३० डिसेंबर (वार्ता.) – धाराशीव येथे खड्ड्यांच्या कामात बोगस नावे दाखवून पैसे लाटणार्या १ कोटी १२ लाख रुपयाच्या घोटाळ्याचे पुनर्अन्वेषण करण्याची घोषणा रोजगार हमी योजनामंत्री संदीपान भुमरे यांनी विधानसभेत केली. आमदार कैलास घाडगे पाटील यांनी ३० डिसेंबर या दिवशी याविषयी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.
या घोटाळ्यातील ७५ लाख ७० सहस्र रुपये वसूल करण्यात आले असून उर्वरित रकमेच्या वसुलीची प्रक्रिया चालू आहे. या प्रकरणात खुली चौकशी करून सहगटविकास अधिकारी एस्.डी. तायडे यांसह ४ जणांना निलंबित करण्यात आले आहे. कंत्राटी कर्मचार्यांची सेवा समाप्त करण्यात आले आहे. असे प्रकार रोखण्यासाठी अधिकोषातील खाती आधारकार्डशी जोडण्यात आली असल्याचे संदीपान भुमरे यांनी सांगितले.