पंतप्रधान मोदी यांच्या मातोश्री हिराबा मोदी पंचतत्त्वात विलीन
कर्णावती (गुजरात) – गेल्या २ दिवसांपासून आजारी असणार्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिरबा मोदी यांचे येथील ‘यूएन् मेहता इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओलॉजी अँड रिसर्च सेंटर’मध्ये उपचार चालू असतांना ३० डिसेंबरच्या पहाटे निधन झाले. त्या १०० वर्षांच्या होत्या. २८ डिसेंबर २०२२ या दिवशी हिराबेन यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना येथील रुग्णालयात भरती करण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर मागील दोन दिवसांपासून उपचार चालू होते. हिराबेन यांच्यावर सकाळी साडेनऊ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. त्यांनी आईच्या मृतदेहाला खांदा दिला. अंत्ययात्रेच्या वेळी ते वाहनात पार्थिवाजवळ बसून राहिले.
आईचे जीवन म्हणजे एका तपस्वीची यात्रा ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आईच्या निधनाविषयी ट्वीट करून सांगितले की, आईचेे जीवन म्हणजे एका तपस्वीची यात्रा होती. आई म्हणजे निष्काम कर्मयोगी आणि आदर्श मूल्यांनी जीवन जगण्याचे प्रतीक आहे. मी जेव्हा त्यांना त्यांच्या १०० व्या वाढदिवसानिमित्त भेटलो, तेव्हा त्यांनी एक गोष्ट सांगितली होती, ‘काम करा बुद्धीने आणि जीवन जागा शुद्धीने !’
शानदार शताब्दी का ईश्वर चरणों में विराम… मां में मैंने हमेशा उस त्रिमूर्ति की अनुभूति की है, जिसमें एक तपस्वी की यात्रा, निष्काम कर्मयोगी का प्रतीक और मूल्यों के प्रति प्रतिबद्ध जीवन समाहित रहा है। pic.twitter.com/yE5xwRogJi
— Narendra Modi (@narendramodi) December 30, 2022
आईच्या अंत्यसंस्कारानंतर पंतप्रधान मोदी लगेचच जनतेच्या सेवेत !
पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या आईच्या अंत्यसंस्कारानंतर कर्णावती येथूनच ऑनलाईन उपस्थित राहून कोलकाता येथील हावडा-न्यू जलपाईगुडी ‘वन्दे भारत’ रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला.
The Vande Bharat Express between Howrah to New Jalpaiguri will improve connectivity and provide greater opportunities for economic growth and tourism. Glad to have flagged off this train. pic.twitter.com/lAlic3CysN
— Narendra Modi (@narendramodi) December 30, 2022
या कार्यक्रमात सहभागी झालेल्या बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोदींच्या आईच्या निधनाविषयी शोक व्यक्त केला. त्या म्हणाल्या की, हा दिवस तुमच्यासाठी वेदनादायी आहे. तुमच्या मातोश्री म्हणजे आमच्याही आई होत्या. देव तुम्हाला तुमचे कार्य पुढे चालू ठेवण्याचे बळ देवो. मी तुम्हालाही थोडी विश्रांती घेण्याची विनंती करते.