ऊसतोडणी कामगार पुरवणार्या मुकादमांकडून होणारी फसवणूक रोखण्यासाठी ९ जानेवारीला मुंबईत बैठक ! – अतुल सावे, सहकारमंत्री
नागपूर, २९ डिसेंबर (वार्ता.) – महाराष्ट्रात एकूण १८८ साखर कारखाने आहेत. यापुढे ‘गोपीनाथ मुंडे ऊसतोड महामंडळा’च्या माध्यमातून सर्व कारखानदारांनी कामगार घेतल्यास मुकादमांना आगाऊ रक्कम (ॲडव्हान्स) देण्याची वेळ येणार नाही आणि फसवणूक होणार नाही. यासंदर्भात सविस्तर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी ९ जानेवारी या दिवशी मुंबई येथे बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन सहकारमंत्री अतुल सावे यांनी दिले. ऊस तोडणीसाठी कामगार पुरवणारे मुकादम लाखो रुपयांची उचल घेऊन कामगारांचा पुरवठा न करता ते वाहनमालकांचे पैसे बुडवत आहेत. एकट्या सोलापूर जिल्ह्यातील ३२ साखर कारखान्यांकडे ऊस वाहतूक करणार्या वाहनमालकांचे मुकादमांनी मागील गळीत हंगामामध्ये सुमारे १२५ कोटी रुपये बुडवले आहेत. या संदर्भात शासनाने त्वरित कार्यवाही करावी, अशी लक्षवेधी सूचना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली होती.
या वेळी अजित पवार यांनी ऊसतोड कामगारांची वाहतूक करणार्या वाहनधारकांची लूट थांबवण्यासाठी त्यांना शासनाने कायदेशीर संरक्षण द्यावे. दोषी मुकादम आणि संबंधित यांवर गुन्हा नोंद करून ऊस वाहतूकदारांची आर्थिक आणि जीवीतहानी टाळावी, अशी मागणी केली. याविषयी ‘आतापर्यंत मुकादमांकडून ज्या फसवणुकीच्या घटना झाल्या आहेत, त्या ठिकाणी त्यांच्यावर त्वरित गुन्हे नोंद होऊन, कारवाई होणे आवश्यक आहे. मुकादमांवर पोलीस ठाण्यात तक्रारी प्रविष्ट होत नाहीत, त्यामुळेच त्यांचे फावते आहे’, असे मतही काही सदस्यांनी या वेळी व्यक्त केले.