सानपाडा येथील ओरिएंटल महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून रस्त्यावर अश्लील चाळे, पोलिसांत तक्रार
नवी मुंबई, २९ डिसेंबर (वार्ता.) – सानपाडा येथील ओरिएंटल महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून रस्त्यावर मुलींसह अश्लील चाळे आणि मारामारी केली जाते, अशी तक्रार सानपाडा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सानपाडा पोलीस ठाण्यापासून जवळच ओरिएंटल महाविद्यालय आहे. या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून सानपाडा रेल्वेस्थानकाच्या परिसरात, किऑक्स आवार, वाहनतळाचा परिसर, रस्त्यावर आणि अन्य सार्वजनिक ठिकाणी अश्लील चाळे केले जात आहेत. स्थानिक रहिवासी या प्रकाराने त्रस्त झाले असून महिला, युवती यांना ये-जा करतांना माना खाली घालूनच वावरावे लागते. तसेच या विद्यार्थ्यांकडून नेहमी पुष्कळ प्रमाणात आरडाओरडा करणे, एकमेकांना शिवीगाळ करणे, दुचाकी वेगाने चालवणे, मुलींशी मस्ती करणे, मुला-मुलींकडून सिगारेट ओढणे असे प्रकार केले जातात.
परिसरातील वातावरण बिघडत असल्याने रहिवाशांमध्ये याविषयी संतप्त प्रतिक्रिया आहेत. महाविद्यालयात विद्यार्थ्यांतील वादावरून या परिसरात यापूर्वी एकाची हत्याही झाली आहे. काही दिवसापूर्वीच या विद्याथ्र्यांच्या भांडणामध्ये त्यांच्याकडे चाकू-सुरेही सापडले होते.
याविरोधात भाजपाचे सानपाडा विभागामधील समाजसेवक पांडुरंग आमले यांनी स्थानिक रहिवाशांसमवेत ओरिएंटल महाविद्यालयाचे प्राचार्य मौर्या आणि सानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारत कामत यांच्याकडे तक्रार केली आहे.
अश्लील चाळे किंवा अयोग्य वागणे यांविषयी या मुलांना स्थानिकांनी समजावण्याचा प्रयत्न केल्यास विद्यार्थ्यांकडून त्यांनाच शिवीगाळ आणि दमदाटी करण्यात येते. समस्येचे गांभीर्य पहाता महाविद्यालयाच्या बाहेरील परिसरात साध्या वेशातील पोलिसांची गस्त वाढवून या प्रकाराचा बिमोड करावा आणि स्थानिक रहिवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी पांडुरंग आमले यांनी केली आहे.
संपादकीय भूमिकाअशा विद्यार्थ्यांवर आताच कठोर कारवाई केली नाही, तर ‘भविष्यातील गुंड’ म्हणून ते ओळखले जातील. पोलिसांचा कोणताही धाक न उरल्याने पोलीस ठाण्याच्या जवळच असे प्रकार होणे, हे पोलिसांसाठी लज्जास्पद नव्हे का ? |