भारतीय कुटुंबव्यवस्थेचे व्यक्तीची आध्यात्मिक उन्नती होण्यात असलेले महत्त्वपूर्ण योगदान !
‘सनातन संस्थेत अनेक वयस्कर, वृद्ध साधिका ज्यांना आपण ‘आजी’ म्हणू शकू, अशांनी संतपद गाठले आहे. यांतील कितीतरी वयस्कर साधिकांची (आजींची) नावे प्रसारात सेवा करणार्या साधकांनी ऐकली नाहीत. वयस्कर साधिका वयोमानानुसार समष्टी साधना करू शकत नाहीत. ‘त्यांनी कशा प्रकारे साधना करून संतपद गाठले आहे ?’, याविषयी विचार केला असता सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) कृपेने पुढील सूत्रे माझ्या लक्षात आली.
सनातन संस्थेच्या माध्यमातून साधना करून संतपदी विराजमान झालेल्या वयस्कर साधिका (संत आजी) !सनातन संस्थेच्या माध्यमातून साधना करून १.११.२०२२ या दिवसापर्यंत एकूण ११७ साधकांनी संतपद प्राप्त केले आहे. त्यांपैकी ५३ वयस्कर साधिका (आजी) संतपदी विराजमान आहेत. १. एकूण संत – ११७ १ अ. एकूण आजी (वयस्कर साधिका) संत – ५३ १ अ १. व्यष्टी आजी (वयस्कर साधिका) संत – ४१ १ अ २. समष्टी आजी (वयस्कर साधिका) संत – १२ १ आ. एकूण आजोबा (वयस्कर साधक) संत – ४१ १ आ १. व्यष्टी आजोबा (वयस्कर साधक) संत – २४ १ आ २. समष्टी आजोबा (वयस्कर साधक) संत – १७ ‘हिंदु धर्मात सांगितल्याप्रमाणे धर्माचरण केल्यास आध्यात्मिक उन्नती होते’, हे वरील आजी संतांच्या (वयस्कर साधिकांच्या) संख्येवरून सिद्ध होते. |
१. वयस्कर साधिका (आजी) साधनेत येण्यापूर्वी त्यांच्या घरातील धार्मिक वातावरण आध्यात्मिक उन्नती होण्यास पोषक असणे
१ अ. घरातील व्यक्ती धर्मपरायण असल्याने आताच्या वयस्कर साधिकांमध्ये त्यांच्या लहानपणापासूनच देवतांप्रती आदर, भाव आणि श्रद्धा निर्माण होणे
१ अ १. प्रतिदिन घरी देवपूजा करणे आणि स्तोत्रे म्हणणे यांमुळे साधिकांवर साधनेचे संस्कार होणे : सध्या अशा वयस्कर साधिकांची तिसरी पिढी चालू आहे. ज्या वेळी त्या साधिकांचा जन्म झाला होता, त्या वेळी म्हणजे अनुमाने ६० ते ६५ वर्षांपूर्वी घरातील वातावरण धार्मिक असायचे. त्या काळी प्रतिदिन सकाळी घरात देवपूजा आणि आरती होत असे. घरातील व्यक्ती सकाळी अंघोळ करतांना आणि झाल्यावर श्रीरामरक्षा, मारुतिस्तोत्र यांसारखी स्तोत्रे म्हणत. घरातील व्यक्तींचा सायंकाळी ‘प्रार्थना, श्लोक, स्तोत्रे आणि भजन म्हणणे’, असा नित्यक्रम असे आणि ते न केल्यास मुलांना शिक्षा केली जायची. त्यामुळे आताच्या वयस्कर साधिकांवर त्यांच्या लहानपणापासून नकळतच साधनेचा संस्कार झाला आहे.
१ अ २. घरातील व्यक्तींकडून कुलाचाराचे पालन, व्रतवैकल्ये आणि तीर्थयात्रा करणे, यांमुळे धर्माचरण होणे : त्या वेळी घराघरांत कुलाचाराचे पालन केले जायचे. घरातील व्यक्ती अनेक व्रतवैकल्ये करत असत. घरातील व्यक्ती प्रत्येक मासाला एकादशी, संकष्टी चतुर्थी आणि तत्सम उपवास करत असत. घरोघरी रामनवमी, हनुमान जयंती, जन्माष्टमी, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दिवाळी यांसारखे धार्मिक सण आणि उत्सव शास्त्रानुसार साजरे केले जायचे. त्या काळी तीर्थक्षेत्रांना भेटी देणे, असे असायचे. घरातील व्यक्ती जवळ असलेल्या देवळांत नियमितपणे जात असत.
१ अ ३. मुलांचे आई-वडील आणि आजी-आजोबा धर्मपरायण असल्यामुळे मुलांवर धार्मिकतेचे संस्कार होणे : मुलांचे आई-वडील धर्माचरणी आणि धर्मपरायण असल्यामुळे मुलांच्या मनावर धार्मिकतेचे संस्कार पुष्कळ चांगल्या प्रकारे रुजवले जायचे. जवळपासच्या देवळांत किंवा आसपास कुठे कीर्तने-प्रवचने असतील, तर मुलांचे आजी-आजोबा आवर्जून नातवंडांना समवेत घेऊन जायचे, तसेच देवळांतही घेऊन जायचे. त्यामुळे मुलांमध्ये देवतांविषयी पुष्कळ आदर, भाव आणि श्रद्धा निर्माण होत असे.
१ आ. मुलींवर केले जाणारे संस्कार आणि त्यामुळे त्यांना झालेले लाभ
१ आ १. मुलींना संसारोपयोगी शिक्षणासह योग्य प्रकारे आचरण करण्याचे शिक्षण दिले जाणे : त्या काळात मुलींना आवश्यक तेवढे शिक्षण दिले जायचे. मुलींना संसारासाठी उपयोगी असे पाककला, शिवणकाम, भरतकाम यांचे शिक्षण दिले जायचे, तसेच मुलींना ‘संसार कसा करावा ? सासरी गेल्यावर तिथे कसे वागावे ? पतीशी कसे वागावे ? पतीचा आदर आणि मान कसा ठेवावा ? सासूला मान कसा द्यावा ? घरातील थोरामोठ्यांशी कसे वागावे ?’, हे आवर्जून शिकवले जायचे. ‘जीवनात समाधानी रहाणे किती आवश्यक आहे आणि ते कसे रहायचे ?’, हे जसे माता मुलींच्या मनावर बिंबवत असत, तसे सासूबाईही सुनांच्या मनावर बिंबवत असत.
१ आ २. इतरांचा विचार करतांना मुलींमधील प्रेमभावात वाढ होणे आणि त्या लग्नानंतर सासरी गेल्यानंतर परेच्छेने वागल्याने त्यांचा अहं न्यून होणे : ‘घरातील व्यक्तींचा सतत विचार करणे, त्यांना आवडेल असे वागणे, लग्नानंतर पतीसाठी आणि मुले झाल्यावर त्यांच्यासाठी सतत झटणे अन् तेही कर्तव्य म्हणून प्रेमाने आणि निरपेक्षपणे करणे, सर्वांना प्रेम देणे’, या सगळ्यांचे महत्त्व मुलींच्या मनावर बिंबवले जायचे. त्यामुळे त्या काळातील मुलींमधील प्रेमभावात पुष्कळ वाढ झाली आणि त्या साधनेत आल्यावर त्यांना प्रेमभावाचे रूपांतर प्रीतीच्या टप्प्यात करणे पुष्कळ सोपे गेले. त्या काळातील मुलींच्या मनावर लहानपणापासून इतरांच्या इच्छेने, म्हणजेच परेच्छेने वागण्याचे महत्त्व मोठ्या प्रमाणावर बिंबवले जायचे. त्या काळातील मुली लग्नानंतर अशा प्रकारे वागल्यामुळे नकळतच त्यांचा अहं न्यून होण्यास साहाय्य व्हायचे.
१ आ ३. घरकामांत व्यस्त असल्याने महिलांकडून अनावश्यक कृती करणे टाळले जाणे : त्या काळातील महिला पहाटे उठल्यावर स्वतः जात्यावर दळण दळणे, घरातील स्वच्छता करणे, भांडी घासणे, कपडे धुणे, स्वयंपाक करणे, वाटण पाट्यावर वाटणे इत्यादी कामे करत असल्यामुळे त्या दिवसभर व्यस्त राहून त्यांची प्रकृती चांगली रहायची. त्या कामांत व्यस्त असल्याने त्यांच्याकडून अनावश्यक कृती करणे आपोआप टाळले जायचे. त्यातूनही वेळ मिळाल्यास त्या धार्मिक ग्रंथांचे वाचन करत असत. आताच्या पिढीतील महिला भ्रमणभाष आणि दूरचित्रवाहिन्यांवरील कार्यक्रम पहाणे, सामाजिक प्रसारमाध्यमांचा वापर करणे इत्यादी अनेक कृती करण्यात पुष्कळ वेळ वाया घालवतात, तसे पूर्वीच्या काळी होत नसे.
१ आ ४. महिला धर्माचरण करत असल्याने त्यांच्यातील सात्त्विकता वाढणे आणि त्यांचे अनिष्ट शक्तींच्या आक्रमणापासून रक्षण होणे : त्या वेळी महिलांचे राहणीमान साधे असायचे. त्यांच्याकडून धर्माचरणाला प्राधान्य दिले जायचे. ‘सात्त्विक पोषाख करणे, उदा. सहावारी-नऊवारी साडी नेसणे, केस मोकळे न सोडणे, कुंकू लावणे, पायांतील बोटांत जोडवी आणि पायांत पैंजण घालणे, कान-नाक टोचणे, परिस्थितीनुसार सोन्या-चांदीचे अलंकार घालणे’ इत्यादी अनेक कृतींमुळे त्यांचे अनिष्ट शक्तींच्या आक्रमणापासून रक्षण होत असे आणि त्यांच्यातील सात्त्विकता वाढत असे.
१ आ ५. देवाच्या अनुसंधानात राहून परिस्थिती स्वीकारणे : पूर्वीच्या काळी दूरभाष नव्हते. त्यामुळे मुलींचा विवाह झाल्यावर त्यांचा माहेरशी फार संबंध रहायचा नाही. कधीतरी पत्र पाठवणे किंवा वर्षातून एखाद्या वेळी घरी जाणे, याव्यतिरिक्त त्यांचा माहेरशी संपर्क नसायचा. त्यामुळे त्यांना दैनंदिन अडचणी किंवा दुःख देवाला सांगायची सवय लागल्यामुळे त्यांचे देवाशी अनुसंधान आपोआप रहात असे. घरात निर्माण होणारी परिस्थिती त्यांच्याकडून पूर्णपणे स्वीकारली जायची. त्यांचे सासूबाईंशी जुळत नसल्यासही त्या कधी उलट बोलत नसत. पती कसाही असला, तरी त्याला देव मानून त्याच्यावर प्रेम केले जायचे.
१ आ ६. प्रत्येक परिस्थितीत आनंदी रहाणे : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले म्हणतात, ‘‘प्रारब्ध स्वीकारणे, ही श्रेष्ठ प्रतीची साधना आहे.’’ त्या काळातील मुलींची (म्हणजेच आताच्या वयस्कर साधिकांची) सर्व प्रसंगांत साधनाच होत असे. त्यांच्याकडून ‘आहे त्या परिस्थितीत आनंदी कसे रहाता येईल ?’, ते पाहिले जायचे.
२. सनातन संस्थेच्या माध्यमातून साधनेला प्रारंभ केल्यावर त्या काळातील मुलींची (आताच्या वयस्कर साधिकांची (आजींची)) शीघ्र आध्यात्मिक उन्नती होणे
२ अ. मुलींवर पूर्वीपासून झालेल्या धार्मिकतेच्या संस्कारांमुळे त्यांना साधना करणे सोपे जाणे : त्या काळातील मुलींना सनातन संस्थेच्या माध्यमातून ज्या वेळी योग्य साधनेविषयी कळले, त्या वेळी त्यांच्यावर पूर्वी झालेल्या धार्मिकतेच्या संस्कारांमुळे त्यांना साधना करणे सोपे गेले. त्यांना ईश्वराच्या लागलेल्या गोडीमुळे भावजागृतीचे प्रयत्न करणे अतिशय सोपे झाले. ‘इतरांचा विचार करणे, प्रेमभावाने वागणे, पतीचे पूर्णपणे ऐकणे, सासरच्या मंडळींच्या मनाप्रमाणे वागणे, म्हणजेच परेच्छेने वागणे’ या गुणांमुळे त्यांच्यातील अहं मोठ्या प्रमाणात न्यून झाला. त्यामुळे त्यांच्यात साधनेसाठी आवश्यक गुण चांगल्या प्रकारे निर्माण झाले होते. त्यांच्यावर झालेल्या अशा संस्कारांमुळे त्या साधना करतांना त्यांना जे सांगितले जायचे, ते त्यांनी श्रद्धेने केले. त्यांना अष्टांग साधनेतील ‘१. स्वभावदोष-निर्मूलन आणि गुण-संवर्धन, २. अहं-निर्मूलन, ३. नामजप, ४. भावजागृतीसाठी करायचे प्रयत्न, ५. सत्संग, ६. सत्सेवा, ७. सत्साठी त्याग आणि ८. प्रीती (इतरांविषयी निरपेक्ष प्रेम)’ हे टप्पे व्यष्टी साधनेअंतर्गत सहज जमू लागले. त्या एकत्र कुटुंबात राहिल्यामुळे, तसेच त्यांच्यावर झालेल्या संस्कारांमुळे त्यांच्यातील स्वभावदोष आणि अहं न्यून होण्यास साहाय्य झाले.
त्यांची स्वीकारण्याची वृत्ती चांगली असल्यामुळे ‘कुलदेवतेचा नामजप करणे, काळानुसार सांगितलेला दत्त, श्रीकृष्ण किंवा सप्तदेवतांपैकी आवश्यक तो नामजप करणे’ इत्यादी त्यांनी सहज स्वीकारल्यामुळे त्यांना साधनेतील पुढचा टप्पा लवकर गाठण्यास साहाय्य झाले.
२ आ. समष्टी साधना केल्याने व्यापकता निर्माण होणे : ‘सत्संगाला जाणे, संपर्कात आलेल्या सर्वांना गुरुकृपायोगानुसार साधना सांगणे, त्यांना सात्त्विक उत्पादनांचे महत्त्व समजावून सांगणे आणि समष्टीसाठी प्रार्थना अन् नामजप करणे’ इत्यादी कृतींमुळे वयस्कर साधिकांमध्ये व्यापकता निर्माण होऊन त्यांची समष्टी साधना होत गेली.
३. भारतीय कुटुंबव्यवस्थेत रुजवलेल्या मूल्यांमुळे व्यक्तीची आध्यात्मिक उन्नती सहजतेने होणे
या सगळ्या घटकांमुळे त्यांची साधना पुष्कळ चांगल्या प्रकारे होत गेली आणि त्या संतपदी विराजमान झाल्या. ‘भारतीय कुटुंबव्यवस्थेत रूजवलेल्या मूल्यांमुळे व्यक्तीची आध्यात्मिक उन्नती कशी सहजतेने होते’, हेही लक्षात येते.
‘हिंदु धर्मात सांगितल्याप्रमाणे धर्माचरण केल्यास त्यातून आध्यात्मिक उन्नती होते आणि त्याचाच लाभ या वयस्कर साधिकांना (आजीबाईंना) होत आहे’, असे लक्षात येते.’
– (सद्गुरु) राजेंद्र शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२०.४.२०२२)
|