ठाणे शहरात ‘हर्बल’च्या नावाखाली हुक्का पार्लरचा सुळसुळाट !
ठाणे – शहरात ‘हर्बल’च्या (वनौषधींच्या) नावाखाली हुक्का पार्लरचा सुळसुळाट झाला असून त्यामुळे तरुण पिढी उद्ध्वस्त होत आहे. या अनधिकृत व्यवसायावर कायमस्वरूपी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी अधिवेशनात केली. त्या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर नोंद घेत ठोस कारवाईचे निर्देश दिले आहेत. ‘हुक्का पार्लरवर याआधी कारवाया झाल्या आहेत. तरीही हे व्यवसाय चालू असतील, तर त्यावर नक्की कारवाई होईल’, असे सांगत फडणवीस यांनी पोलीस प्रशासनाला कारवाईचे आदेश दिले आहेत.
ठाणे शहरात अनधिकृतपणे चालू असलेल्या हुक्का पार्लरविरोधात आमदार संजय केळकर यांनी गेल्या वर्षभरापासून मोहीम उघडली आहे. याविषयी त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात गृहमंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता; मात्र त्यावर ठोस कारवाई झाली नाही. आता भाजप-शिंदे गटाचे सरकार असून मध्यंतरी ठाणे येथे हुक्का पार्लरवर कारवाई झाली; परंतु ते ‘हर्बल’ हुक्का पार्लर पुन्हा चालू झाल्याचे आमदार केळकर यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणले. ठाणे शहर हे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक शहर आहे. या शहराची या व्यवसायामुळे अपकीर्ती होत आहे. या अनधिकृत व्यवसायावर ठोस आणि कायमस्वरूपी कारवाई करण्याची मागणी केळकर यांनी केली आहे.
संपादकीय भूमिकातरुण पिढी उद्ध्वस्त करणाऱ्या हुक्का पार्लरचा सुळसुळाट न रोखणारे पोलीस समाजद्रोहीच होत ! |