कोणतेही खत न घालता ‘सुभाष पाळेकर कृषी’ तंत्राने केलेली लागवड
जून २०२१ मध्ये मला ‘सुभाष पाळेकर कृषी’ या लागवड तंत्राविषयी एका ‘ऑनलाईन’ शिबिरातून समजले. हे शिबिर स्वतः पद्मश्री सुभाष पाळेकर यांनी घेतले होते. शिबिरामध्ये त्यांनी ‘लागवड करतांना कोणतेही खत घालायचे नाही’, हे वारंवार सांगितले. त्यानंतर घरी केलेल्या लागवडीमध्ये मी जीवामृत, बीजामृत (जीवामृत आणि बीजामृत म्हणजे देशी गायीचे शेण, गोमूत्र इत्यादींपासून बनवलेली झाडांसाठीची नैसर्गिक खते) इत्यादींचा उपयोग करणे, नियमित ‘आच्छादन करणे (माती पालापाचोळ्याने झाकणे)’ इत्यादी सर्व केले; परंतु ‘काहीच खत न घालता भाजीपाला मिळेल का ?’, अशी शंका मनात होती. आता गेले वर्षभर या तंत्राने लागवड केल्यावर ही शंका पूर्णपणे मिटली. या प्रक्रियेत आम्ही आमच्या लागवडीत केलेले प्रयत्न आणि शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत.
१. पेठेतून (बाजारातून) खते आणणे थांबवणे
‘सुभाष पाळेकर कृषी’ या लागवड तंत्राचा अभ्यास करायचा असेल, तर त्यांनी सांगितलेली तत्त्वे १०० टक्के पाळायची’, असे ठरवून आम्ही पेठेतून खते आणणे थांबवले. ‘खतांमुळेच झाडे वाढतात’, हा संस्कार मनावर असल्याने ‘न्यूनतम मोठ्या फळझाडांना थोडे खत घालावे’, असे विचार यायचे; परंतु ‘काही विपरित परिणाम झालाच, तर त्यातूनही शिकायला मिळेल’, असा विचार करून खत आणले नाही.
२. नियमितपणे जीवामृत वापरणे
जीवामृत बनवण्याची पद्धत शिकून घेतली आणि घरच्या घरी ते नियमितपणे बनवून लागवडीत वापरण्यास आरंभ केला, तसेच जीवामृताची फवारणी करण्यास चालू केले. यामुळे एका मासातच झाडांचा रंग तजेलदार होऊन ती पूर्वीपेक्षा टवटवीत झाल्याचे लक्षात आले.
३. पालापाचोळ्याचा वापर करणे
वाफे आणि कुंड्या भरतांना ‘नारळाच्या शेंड्या, झाडाच्या वाळलेल्या काड्या, पालापाचोळा इत्यादी सर्व घटक अधिक प्रमाणात घालून माती अत्यल्प प्रमाणात घालणे’, असे करण्यास आरंभ केला. पालापाचोळ्याचे जसे विघटन होऊ लागले, तसा मातीचा भुसभुशीतपणा वाढला आणि रोपांच्या वाढीवर त्याचे सकारात्मक परिणाम दिसू लागले.
४. विटांचे वाफे अधिक लाभदायक असल्याचे लक्षात येणे
‘विटांच्या वाफ्यांमुळे (लागवडीसाठी बनवलेल्या कप्प्यांमध्ये) पाण्याचा निचरा चांगल्या पद्धतीने होतो आणि कुंडीपेक्षा वाफे लागवडीसाठी अधिक लाभदायक आहेत’, हे लक्षात आले. ‘झाडांच्या मुळांना वाढण्यासाठी केवळ ४ ते ६ इंचांची उंचीही पुरेशी असते’, हे अनुभवले. वाफ्यांमध्ये एकदल आणि द्विदल अशी मिश्र लागवड करणे सहज शक्य होते. मिश्र लागवड, नियमित पालापाचोळ्याचे आच्छादन करणे आणि जीवामृत घालणे यांमुळे वाफ्यांत ‘सशक्त माती (सुपीक माती)’ निर्माण होण्याची प्रक्रिया कुंड्यांच्या तुलनेत अधिक चांगली होते.
५. माती सुपीक होण्यासाठी प्रयत्न करणे
‘लागवडीच्या आरंभी रोपांपेक्षा मातीवरच अधिक काम करायला हवे’, हे लक्षात आले. पद्मश्री सुभाष पाळेकर यांनी सांगितल्याप्रमाणे माती ही रोपांची आणि पर्यायाने आपल्या सर्वांची आई आहे. जसे सुदृढ बाळ जन्माला येण्यासाठी आईच्या आरोग्याची काळजी घेतली जाते, तसेच चांगले पीक येण्यासाठी चांगली माती सिद्ध होण्याकरता वेळ देणे आवश्यक आहे.
६. आपत्काळाच्या दृष्टीने सर्वाधिक उपयुक्त शेतीपद्धत
या शेतीपद्धतीत पेठेतून खते, किटकनाशके इत्यादी काहीच आणावे लागत नाही. सोप्या पद्धतीने घरच्या घरी जीवामृत, किटकनाशके इत्यादी बनवता येतात. त्यामुळे आपत्काळात या पद्धतीने लागवड करणे सहज शक्य आहे. यातून मिळणारी फळे आणि भाजीपाला संपूर्णपणे विषमुक्त अन् आरोग्यदायी आहे.
७. मॅकोलेप्रणीत शिक्षणपद्धतीमुळे कृषी विद्यापिठांनी पसरवलेले चुकीचे सिद्धांत
आतापर्यंत आपली कृषी विद्यापिठे आणि शिक्षणपद्धत यांनी ‘खतांविना पीक येतच नाही’, हाच संस्कार आपल्यावर केला आहे. ‘अमुक झाडाला एवढ्या प्रमाणात खत हवे. एवढ्या प्रमाणात नत्र, स्फुरद, पालाश हे घटक हवेत’, असे विद्यापिठे शिकवतात. या व्यवस्थेच्या पूर्ण विरोधी असलेला ‘कोणतेही खत हे झाडाचे अन्न नाही’, हा सिद्धांत ‘आर्य कृषक’ मोहन देशपांडे, पद्मश्री सुभाष पाळेकर इत्यादी संशोधकांनी स्वतःच्या संशोधनाने मांडून अनेक प्रयोगांद्वारे तो सिद्धही केला आहे. झाडांना अन्नद्रव्ये पुरवण्याच्या व्यवस्थेचे सर्व नियंत्रण मातीतील जिवाणूंकडे असते. ‘कोणत्या झाडाला मातीतील खनिजे किती प्रमाणात पुरवायची’, हे जिवाणू ठरवतात. त्यामुळेच या नैसर्गिक शेती तंत्रामध्ये आपण केवळ मातीतील जिवाणूंची संख्या आणि ओलावा यांचे नियंत्रण करतो. पुढील सर्व व्यवस्था निसर्ग स्वतःच पहातो.’
– सौ. राघवी मयूरेश कोनेकर, ढवळी, फोंडा, गोवा. (२८.१२.२०२२)
‘सुभाष पाळेकर कृषी’ या तंत्राच्या उपयोगामुळे लागवडीत झालेले पालट
१. ‘झाडांना नियमित जीवामृत देणे’, हा या लागवड पद्धतीचा आत्मा आहे. यामुळे मातीतील जिवाणूंची संख्या वाढते आणि झाडांची वाढ जोमाने होते. नियमित जीवामृत दिल्यामुळे –
अ. आमच्या १ वर्षे वयाच्या लिंबाच्या कलमी झाडाला नियमित लिंबू येऊ लागले. सध्या झाडावर एका वेळी २५ ते ३० लिंबू असतात.
आ. ८ मासांच्या पपईच्या झाडाला ३ पपया आल्या.
इ. मोठ्या कुंडीत लावलेल्या सोनचाफ्याच्या कलमी झाडापासून एप्रिल ते जून २०२२ या कालावधीत १०० हून अधिक फुले मिळाली.
ई. दहा मासांच्या पेरूच्या रोपाला पेरू येऊ लागले.
२. प्रत्येक झाडाची अन्नद्रव्यांची आवश्यकता निरनिराळी असते. पालेभाज्या, वांगी, मिरची, टोमॅटो इत्यादी भाज्यांना आवश्यक असलेल्या अन्नद्रव्यांच्या तुलनेत भोपळा, कोहळा, दुधी, फ्लॉवर, कोबी, तसेच सर्व मोठी फळझाडे यांची अन्नद्रव्यांची भूक अधिक असते. त्यामुळे या झाडांना शेतात अधिक प्रमाणात खते घातली जातात; परंतु ‘सुभाष पाळेकर कृषी’ या तंत्रात ही अन्नद्रव्ये सहज उपलब्ध होऊन कुठलेच खत न घालता या सर्व भाज्या छतावर पिकवता येतात’, याचा अनुभव आम्ही घेतला. (लेखातील वरील छायाचित्रे पहावीत.)
३. या तंत्राच्या उपयोगाने लागवडीतील किडींच्या प्रमाणात पुष्कळ घट झाली आणि नैसर्गिक किटकनाशकांच्या फवारणीची वारंवारता घटली.
– सौ. राघवी मयूरेश कोनेकर