पाकिस्तानी सैन्याच्या विरोधात पाकव्याप्त काश्मीरमध्ये तीव्र निदर्शने !

स्थानिक जनतेची भूमी हडपण्याचा होत आहे आरोप !

गिलगिट (पाकव्याप्त काश्मीर) – पाकिस्तानी सैन्य पाकव्याप्त काश्मीरमधील जनतेची भूमी हडप करत असल्याचा आरोप तेथील लोकांकडून करण्यात येत आहे. या विरोधात पाकव्याप्त काश्मीरमधील अनेक शहरांमध्ये सैन्यविरोधी आंदोलने होत आहेत.

१. गिलगिट-बाल्टिस्तान प्रांतात मोठ्या प्रमाणात खनिजे आहेत. असे असले, तरी हा भाग पाकमध्ये सर्वांत मागासलेला आहे. पाकिस्तानी सरकारच्या अनेक जाचक धोरणांमुळे या प्रांतामध्ये सरकारविरोधी आक्रोश आणि राग आहे. यासंदर्भातील अनेक व्हिडिओ ट्विटरवर प्रसारित होत आहेत.

२. या व्हिडिओमध्ये स्थानिक जनता पाकिस्तानी सैन्याच्या विरोधात ओरडत आहे. लोक म्हणत आहेत की, ‘पाकिस्तानी रेंजर्सना (सैन्याला) आमची भूमी हडपू देणार नाही. ही भूमी त्यांच्या वडिलांच्या मालकीची नाही !’

३. एका व्हिडिओमध्ये सैनिक तळ उभारण्यासाठी गेले असता तेथील लोकांनी त्यांना तो उभे करू न देता तेथून जाण्यास भाग पाडले असल्याचे दिसत आहे.

४. यासंदर्भात गिलगिट बाल्टिस्तान येथील ‘नॅशनल इक्वॅलिटी पार्टी’चे अध्यक्ष प्रा. सज्जाद रझा यांनी ट्वीट करून म्हटले, ‘पाकिस्तानी सैन्याकडून भूमी हडपण्याच्या विरोधात तेथील लोक सातत्याने निदर्शने करत आहेत. पाकिस्तान आमच्या आवश्यकताही पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे ‘आम्ही स्वतंत्र होणे’, हाच यावरील एकमेव उपाय आहे !’

५. पाकव्याप्त काश्मीरमधील लोक हे स्वत:ला जम्मू-काश्मीरचा भाग मानतात. यामुळेच पाकिस्तानी सैन्य त्यांचे दमन करण्यासाठी पुढे सरसावले आहे.

संपादकीय भूमिका

पाकिस्तानचे जनताद्रोही स्वरूप जाणा ! याविरोधात आता भारत शासनाने तेथील जनतेच्या पाठीशी उभे राहून त्या भागावर नियंत्रण मिळवून त्यांचे खर्‍या अर्थाने भले करावे !