मालाड येथील पोलीस हौसिंग फेडरेशनला दिलेला भूखंड परत घेणे विचाराधीन ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
विधान परिषद प्रश्नोत्तरे…
नागपूर, २९ डिसेंबर (वार्ता.) – मुंबईमधील मालाड भागातील महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह हौसिंग फेडरेशनला दिलेला म्हाडाचा भूखंड परत घेणे राज्यशासनाच्या विचाराधीन आहे, असे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २९ डिसेंबर या दिवशी विधान परिषदेत सांगितले. मालाड येथील म्हाडाच्या जागेवर झालेल्या अतिक्रमणाविषयीचा प्रश्न सदस्य सुनील शिंदे यांनी प्रश्नोत्तराच्या घंट्यांत उपस्थित केला होता. त्याला उत्तर देतांना फडणवीस बोलत होते. या चर्चेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सदस्य प्रवीण दरेकर आणि विलास पोतनीस यांनी उपप्रश्न उपस्थित करुन सहभाग घेतला.
उपमुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, मालाड (प) भागातील दादासाहेब गायकवाडनगर, मालवणी येथील बेस्ट डेपोलगतचा भूखंड १९९९ मध्ये महाराष्ट्र पोलीस को-ऑप.हौसिंग फेडरेशनला दिला होता. ज्या कारणासाठी हा भूखंड दिला होता, तसा त्याचा उपयोग झाला नाही. विनावापर असलेला हा भूखंड परत घ्यायचा का ? याविषयी राज्यशासन विचाराधीन आहे. या भूखंडावर अनधिकृतपणे होत असलेले भराव टाकण्याचे काम थांबवण्यात आले आहे. या प्रकरणी स्वतंत्र चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्राप्त तक्रारीवर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात येतील.