पटसंख्या अल्प आहे म्हणून राज्यातील एकही शाळा बंद केली जाणार नाही ! – दीपक केसरकर, शालेय शिक्षणमंत्री
विधान परिषद कामकाज
लक्षवेधी
नागपूर – शाळेत शिक्षकांची संख्या अल्प आहे त्यामुळे शिक्षणावर परिणाम होत आहे. तरी फेब्रुवारीपर्यंत सर्व शिक्षकांच्या मुलाखती पूर्ण होतील आणि मार्चमध्ये त्यांना नेमणुका दिल्या जातील. पटसंख्या अल्प आहे म्हणून राज्यातील एकही शाळा बंद केली जाणार नाही, असे आश्वासन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिले. ते सदस्य विक्रम काळे, सतीश काळे, सतीश चव्हाण, तसेच अन्य सदस्य यांनी विचारलेल्या लक्षवेधीवर उत्तर देत होते.
१. सदस्य किरण सरनाईक यांनी राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी पद रखडलेली आहे, तसेच राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्यांचे वेतन थकित आहे याकडे लक्षवेधीद्वारे लक्ष वेधले. यावर उत्तर देतांना दीपक केसरकर म्हणाले, ‘‘या संदर्भात १ जानेवारीला शासकीय परिपत्रक निघेल. त्यानंतर हा प्रश्न सुटलेला असेल. ज्या दिवशी परिपत्रक निघेल तेव्हापासून ही रक्कम देय होईल. याचसमवेत भरती झाली की शिक्षक उपलब्ध होतील.
२. अन्य एका सदस्यांनी राज्यात अनेक ठिकाणी ‘हिरकणी कक्ष’ उपलब्ध नसल्याने महिलांना लहान बालकांना स्तनपान करण्यास अडचणी येतात, तरी राज्यातील प्रत्येक सार्वजनिक हिरकणी कक्ष उभारण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी केली. यावर दीपक केसरकर यांनी ‘याची नोंद सरकार घेईल’, असे उत्तर दिले.