सदस्यांच्या वर्तवणुकीला कंटाळून उपसभापतींनी विधान परिषदेचे कामकाज ५ मिनिटांसाठी स्थगित केले !
नागपूर, २९ डिसेंबर (वार्ता.) – विदर्भातील शेतकर्यांना कृषी पंप मिळण्यास विलंब होत असल्याचा प्रश्न २९ डिसेंबर या दिवशी विधान परिषदेतील तारांकित प्रश्नात आला होता. त्या वेळी सभागृहात यावर चर्चा चालू होती. हा प्रश्न उपस्थित करणारे सदस्य प्रवीण दटके यांनी पुन्हा पुन्हा या प्रश्नावर उपप्रश्न विचारण्याचा अट्टाहास केला, तसेच इतर सदस्यही या प्रश्नांवर बोलण्याची वारंवार मागणी करत होते. त्यामुळे उपसभापती डॉ. नीलम गोर्हे या अप्रसन्न होऊन त्यांनी सभागृहाचे कामकाज ५ मिनिटांसाठी स्थगित केले. या वेळी डॉ. गोर्हे म्हणाल्या की, सभागृहातील सदस्यांचे वर्तन पाहून मला त्यांचा राग आला. त्यामुळे मी ५ मिनिटांसाठी कामकाज स्थगित करत आहे. (सभागृहात सदस्यांचे असे वागणे अशोभनीय आहे ! – संपादक)