राज्यातील अंगणवाड्या दत्तक घेण्यासाठी ८०० संस्थांचा पुढाकार !
नागपूर, २९ डिसेंबर (वार्ता.) – महाराष्ट्र शासनाने अंगणवाडी दत्तक योजना चालू केली आहे. या अंतर्गत ९ सहस्र ७०० जणांशी महिला आणि बाल विकास विभागाकडून पत्रव्यवहार करण्यात आला. याला चांगला प्रतिसाद मिळाला असून ८०० संस्था अंगणवाडी दत्तक घेण्यासाठी पुढे आल्या आहेत, अशी माहिती महिला आणि बाल विकासमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी विधानसभेत दिली. अंगणवाडीविषयीच्या एका लक्षवेधी सूचनेवर मंत्री महोदयांनी वरील माहिती दिली.
प्रत्येक वर्षात ५ सहस्र अंगणवाड्यांना स्मार्ट अंगणवाड्या करण्याचे शासनाचे ध्येय आहे. यासाठी प्रत्येक अंगणवाडीसाठी ५ लाख रुपये इतका व्यय येतो. अंगणवाडीच्या दुरुस्तीचा महिन्याचा व्यय १ सहस्र रुपये इतका येतो. यासाठी वर्षाला सरासरी १ लाख रुपये येतो. अंगणवाडीमध्ये सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यामुळे अंगणवाड्यांना आदर्श करणे ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची योजना आहे, अशी माहिती या वेळी मंगलप्रभात लोढा यांनी सभागृहात दिली.