मुंबईत होणार ‘मराठी विश्व परिषद’ !
२० देशांतील मराठीप्रेमी होणार सहभागी !
नागपूर, २९ डिसेंबर (वार्ता.) – राज्याच्या मराठी भाषा विभागाच्या वतीने मुंबईमध्ये ४ ते ६ जानेवारी २०२३ या कालावधीत वरळी येथील नॅशनल स्पोर्ट स्टेडिअम येथे मराठी विश्व परिषद घेण्यात येणार आहे. या परिषदेत २० देशांतील प्रतिनिधी सहभागी होणार आहेत, अशी माहिती मराठी भाषामंत्री दीपक केसरकर यांनी २९ डिसेंबर या दिवशी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली.
याविषयी माहिती देतांना दीपक केसरकर म्हणाले, ‘‘४ जानेवारी या दिवशी सकाळी १० वाजता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत या परिषदेचे उद्घाटन होणार आहे. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कार्य करणारे जगभरातील ४५६ मराठी भाषाप्रेमी या परिषदेत सहभागी होणार आहेत, तसेच भारतातील विविध शहरांतील ४९८ प्रतिनिधी आणि भारतातील १ सहस्र मराठी भाषाप्रेमी उपस्थित रहाणार आहे. भारतात ज्या भागांत मराठी बोलली जातील त्या भागांतील प्रतिनिधी या परिषदेत सहभागी होणार आहेत. जगभरात मराठी भाषा आणि संस्कृती यांचा प्रसार व्हावा, यासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. सांस्कृतिक आणि उद्योग विभाग यांच्या साहाय्याने ही परिषद होणार आहे. या परिषदेत मराठी संस्कृती आणि भाषा यांविषयीचे कार्यक्रम, तसेच चर्चासत्रे होणार आहेत.’’