बोगस डॉक्टरांवरील कारवाई बोगस असल्याची वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांची स्वीकृती !
नागपूर, २९ डिसेंबर (वार्ता.) – राज्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट आहे. बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यासाठी राज्य आणि तालुका स्तर, तसेच नगरपालिका अन् महानगरपालिका स्तर यांवर समित्या कार्यरत आहेत; मात्र या समित्या कार्यक्षमतेने काम करतांना दिसत नाहीत. या समित्यांची कार्यक्षमता वाढवणे आवश्यक आहे, असे वक्तव्य वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी विधानसभेत केले.
याविषयी गिरीश महाजन म्हणाले, ‘‘पश्चिम बंगाल, बिहार, राजस्थान, झारखंड या राज्यांतून बोगस डॉक्टर महाराष्ट्रात येत आहेत. बोगस डॉक्टरांनी माणसांना जनावरांची औषधे दिल्याच्या काही घटनाही राज्यात घडल्या आहेत. याविषयी ३ मासांत आढावा जिल्हाधिकार्यांना सक्त सूचना देऊ. बोगस डॉक्टरांवर कडक कारवाई झाली पाहिजे. प्रत्यक्षात अशा प्रकरणांत कारवाई करण्यासाठी सक्षम कायदा नाही. त्वरित जामीन मिळल्यामुळे बोगस डॉक्टर सुटतात. त्यांना प्रथम २ सहस्र, दुसर्यांदा २५ सहस्र रुपये इतका दंड आकारला जातो. त्यामुळे कायद्यामध्ये आवश्यक पालट करणे आवश्यक आहे. डॉक्टरांची संख्या आणि लोकसंख्या यांमध्ये तफावत असल्यामुळे हे प्रकार वाढत आहेत. आयुर्वेदिक, ॲलोपेथिक हे उपचार करण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयांना अनुमती देत आहोत. डॉक्टरांची संख्या वाढण्यासाठी केंद्रशासनाचाही प्रयत्न आहे.’’