छत्तीसगड, गुजरात आणि मध्यप्रदेश राज्यांना महाराष्ट्र वाघांचा पुरवठा करणार !
नागपूर, २९ डिसेंबर (वार्ता.) – जगातील १९३ देशांपैकी १४ देशांत वाघ आहेत. जगात सर्वाधिक वाघ भारतात आहेत आणि महाराष्ट्रातील चंद्रपूर हा जगातील सर्वांत अधिक वाघ असलेला जिल्हा आहे. भारतातील ज्या राज्यांना वाघ हवे असतील, त्यांना ते द्यायला आम्ही सिद्ध आहोत. मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि गुजरात या राज्यांनी वाघांची मागणी केली आहे. केंद्रशासनाची अनुमतीने या राज्यांमध्ये महाराष्ट्र वाघ पाठवले, अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत दिली.
आमदार विनोद अग्रवाल यांनी वन्यप्राण्यांमुळे होणारी पिकांची हानी रोखण्याविषयीची लक्षवेधी सूचना २९ डिसेंबर या दिवशी सभागृहात उपस्थित केली होती. त्यावर सविस्तर उत्तर देतांना सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ‘‘वर्ष २०२१-२२ मध्ये वाघाच्या आक्रमणात १५ जणांचा, तर चालू वर्षात राज्यातील २५ माणसांचा मृत्यू झाला आहे. वाघाच्या आक्रमणातून व्यक्तींचा मृत्यू होऊ नये, यासाठी ब्रह्मपुरीमध्ये आपण तरुणांचा एक गट सिद्ध करत आहोत. वाघांची स्थाने आम्ही निश्चित करणार आहोत.’’