‘हलाल प्रमाणपत्र’ असणार्या उत्पादनांवर बहिष्कार टाकून आर्थिक नाकेबंदी करण्याची आवश्यकता ! – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती
पुणे येथे ‘हलाल जिहाद ?’ ग्रंथाचा लोकार्पण सोहळा
पुणे, २८ डिसेंबर (वार्ता.) – आज ‘हलाल जिहाद’ ही भारतीय अर्थव्यवस्थेला समांतर अशी इस्लामी अर्थव्यवस्था निर्माण झाली आहे. इस्लामी देशात आणि भारतातही वस्तू विकण्यासाठी ‘हलाल प्रमाणपत्र’ आवश्यक करण्यात आले आहे. हे प्रमाणपत्र कोणतीही सरकारी यंत्रणा देत नसून ६ खासगी इस्लामी संघटना देतात. पैशांतून ‘जमियत-उलेमा-ए-हिंद’ ही इस्लामी संघटना अनेक आतंकवादी कारवाया, तसेच आतंकवाद्यांना कायदेशीर साहाय्य पुरवते. हे प्रमाणपत्र रहित करावे आणि या सर्व संघटनांची चौकशी व्हावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक श्री. सुनील घनवट यांनी केली. ते ‘हलाल जिहाद’ या ग्रंथाच्या लोकार्पण सोहळ्यात बोलत होते. ‘लव्ह जिहादच्या विरोधात कायदा करून धर्मांधांना जरब बसवण्याची आवश्यकता आहे’, असेही त्यांनी सांगितले.
या वेळी ‘नवा सिंहगड परिसर’ पाक्षिकाचे श्री. जितेंद्र रानडे, तसेच सामाजिक कार्यकर्ते आणि ‘खत्री बंधू आईस्क्रीम’चे प्रोप्रायटर (मालक) श्री. गिरीश खत्री या वेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. ‘सर्वांनी एकत्र येऊन स्वत:ची शक्ती एकवटली, तर हे संकट सहज उधळून लावता येईल. सर्व व्यावसायिक बांधवांच्या वतीने ‘हलाल जिहाद’चा मी जाहीर निषेध करतो’, असे श्री. खत्री यांनी या वेळी सांगितले.
आरंभी समितीचे श्री. पराग गोखले यांनी हिंदु जनजागृती समितीचे विविध उपक्रम आणि या कार्याला आलेले यश यांविषयी माहिती दिली. यानंतर ‘हलाल जिहाद’विषयी प्रबोधनपर ध्वनिचित्रफीत दाखवण्यात आली. हिंदु जनजागृती समितीच्या द्विदशकपूर्तीच्या निमित्त ‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियाना’च्या अंतर्गत सिद्धार्थ सभागृह, सिंहगड रस्ता येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. श्री. दीपक नागपुरे यांची सन्माननीय उपस्थिती होती. हिंदु राष्ट्र निर्मितीच्या प्रतिज्ञेने कार्यक्रमाची सांगता झाली.
याप्रमाणेच भाजप पुणे शहर व्यापारी आघाडी आणि हिंदु जनजागृती समिती यांनी संयुक्त विद्यमाने ‘हलाल जिहाद : आर्थिक षड्यंत्र’ या विषयावर एक विशेष व्याख्यान आयोजित केले होते. पुणे शहर भाजप व्यापारी आघाडीचे अध्यक्ष श्री. महेंद्रजी व्यास यांनी प्रास्ताविक केले, तर श्री. सुनील घनवट यांनी मुख्य विषयावर मार्गदर्शन केले. त्यामध्ये समितीने शासनाकडे केलेल्या मागण्या, समितीला मिळालेले यश आणि यापुढे करावयाची कृती हे सविस्तर मांडले. सर्व व्यापारी प्रतिनिधींनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत कृती समिती स्थापन केल्याचे घोषित केले.
पारगाव येथे ३ डिसेंबर या दिवशी तरुणांनी उत्स्फूर्तपणे बैठकीचे आयोजन केले. गावातील २ टक्के धर्मांधांनी वक्फ बोर्डाच्या साहाय्याने गावातील जागा आणि मंदिर कसे कह्यात घेतले आहे ? आणि यातून बाहेर कसे पडायचे ? याबद्दल श्री. सुनील घनवट यांनी मार्गदर्शन केले. तसेच ‘हलाल जिहाद’चे भयावह स्वरूप सर्वांसमोर मांडले.
लोणावळा येथे खाटीक आणि व्यापारी बांधव यांसमोर श्री. सुनील घनवट यांनी ‘हलाल जिहाद’ हा विषय मांडला. या वेळी उपस्थितांनी व्यापक जनजागृती करण्याचे आश्वासन दिले.
‘खत्री बंधू’ कधीही हलाल प्रमाणपत्र घेणार नाहीत ! – सामाजिक कार्यकर्ते आणि ‘खत्री बंधू आईस्क्रीम’चे प्रोप्रायटर श्री. गिरीश खत्री |