सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी दिलेल्या अमूल्य नामजपरूपी संजीवनीमुळे साधिकेला होणारे शारीरिक त्रास दूर होणे
१. औषधे घेऊनही पित्ताचा आणि डोके दुखण्याचा त्रास दूर न होणे; मात्र नामजपादी उपाय केल्याने ते त्रास न्यून होणे
१ अ. डोके दुखण्याचे कारण लक्षात न येणे; मात्र नामजपादी उपाय केल्यावर काही वेळ त्रास न होणे : ‘६ वर्षांपासून मला अधूनमधून डोके दुखण्याचा त्रास होत होता. ‘माझे डोके कशामुळे दुखते ?’, हे माझ्या लक्षात येत नव्हते. मी नामजपादी उपाय केल्यावर काही वेळ मला डोके दुखण्याचा त्रास होत नसे. त्यामुळे ‘आध्यात्मिक त्रासामुळे माझे डोके दुखत आहे’, असे मला वाटत होते.
१ आ. त्यानंतर मला पित्ताचा (ॲसिडिटी वाढण्याचा) त्रास चालू झाला. माझे डोके पुष्कळ दुखून मला चक्कर आल्यासारखे व्हायचे. त्या वेळी मी औषधे घेऊनही मला अपेक्षित लाभ होत नव्हता.
१ इ. दैनिक ‘सनातन प्रभात’मधील सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्या लेखात सांगितल्यानुसार नामजप केल्यावर पित्ताचा आणि डोके दुखण्याचा त्रास दूर होणे : मला सहसाधिकेने सुचवले, ‘‘११.४.२०२१ या दिवसाच्या दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी लिहिलेला ‘विकार दूर होण्यासाठी आवश्यक असलेल्या देवतांच्या तत्त्वांनुसार दिलेले काही विकारांवरील नामजप’ हा लेख प्रसिद्ध झाला आहे. त्यात लिहिल्यानुसार पित्ताचा (ॲसिडिटी वाढण्याचा) त्रास दूर होण्यासाठी सांगितलेला ‘श्री गणेशाय नमः । श्रीराम जय राम जय जय राम । श्री हनुमते नमः । ॐ नमः शिवाय । ॐ नमः शिवाय ।’, हा नामजप तू कर.’’ त्याप्रमाणे नामजप केल्यावर मला त्याच दिवशी ७० टक्के बरे वाटले. मला होणारा पित्ताचा त्रास २ दिवसांत दूर झाला. मी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये दिलेल्या सूचनेप्रमाणे प्रतिदिन १ घंटा याप्रमाणे १ मास हा नामजप केला. त्यामुळे मला अधूनमधून होत असलेला डोके दुखण्याचा त्रासही दूर झाला.
२. ताप, सर्दी आणि खोकला झाला असतांना ‘ॲलोपॅथी’ची गोळी घेतल्यावर पित्ताचा त्रास होणे अन् नामजपादी उपाय केल्यावर १५ मिनिटांतच बरे वाटणे
काही दिवसांपूर्वी मला ताप, सर्दी आणि खोकला झाला होता. हे त्रास दूर होण्यासाठी आधुनिक वैद्यांनी मला ॲलोपॅथीची एक गोळी दिली होती. ती गोळी घेतल्यावर मला पित्ताचा (ॲसिडिटी वाढण्याचा) त्रास होऊ लागला. तेव्हा पूर्वी मला पित्ताचा (ॲसिडिटी वाढण्याचा) त्रास होत असतांना मी केलेला नामजप आठवला. ३१.७.२०२२ या दिवसाच्या दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ‘विकार दूर होण्यासाठी आवश्यक असलेल्या देवतांच्या तत्त्वांनुसार दिलेले काही विकारांवरील नामजप’, या सद्गुरु गाडगीळकाकांनी लिहिलेल्या लेखाशी संबंधित परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे ‘येणार्या आपत्काळात औषधे उपलब्ध नसतील. तेव्हा या नामजपांचा अलभ्य लाभ होईल’, अशा आशयाचे लिखाण होते. त्याचे मला स्मरण झाले.
तेव्हा ‘माझ्यासाठी हाच आपत्काळ आहे’, असा विचार माझ्या मनात आला. ‘मला या नामजपाने बरे वाटणार आहे’, अशी श्रद्धा ठेवून मी परात्पर गुरु डॉक्टरांना शरण गेले आणि नामजप चालू केला. त्यानंतर साधारण १५ मिनिटांतच मला बरे वाटू लागले आणि शांत झोप लागली.
‘सद्गुरु डॉ. गाडगीळकाकांनी दिलेल्या अमूल्य नामजपरूपी संजीवनीमुळे साधकांचे त्रास दूर होत आहेत’, याबद्दल मी परात्पर गुरु डॉ. आठवले आणि सद्गुरु गाडगीळकाका यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– एक साधिका, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (७.८.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |