सर्वाेच्च न्यायालयाचा निर्णय होईपर्यंत बेळगावप्रदेश केंद्रशासित करा ! – जयंत पाटील, शेकाप
विधान परिषद कामकाज
नागपूर – स्वातंत्र्यानंतर भाषावार प्रांतरचना होतांना तत्कालीन म्हैसूर प्रांतात बेळगावसह मराठी भाषिक गावे समाविष्ट झाली. तेव्हापासून तेथील मराठी बांधव महाराष्ट्रात येण्यासाठी लढा देत आहेत. यात ‘महाराष्ट्र एकीकरण समिती’चे मोठे योगदान आहे. गेली अनेक वर्षे हा प्रश्न सुटलेला नाही. सध्या हा प्रश्न सर्वाेच्च न्यायालयात आहे. न्यायालयाने खटला चालू असतांना हा प्रदेश केंद्रशासित करू नये, असे कुठेही म्हटलेले नाही. त्यामुळे सर्वाेच्च न्यायालयाचा निर्णय होईपर्यंत मराठीबहुल बेळगावप्रदेश केंद्रशासित करावा, अशी मागणी शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी विधान परिषदेत केली.
आमदार जयंत पाटील यांनी या भाषणात राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेचे कौतुक केल्यामुळे उपस्थित अचंबित झाले.
अन्य घडामोडी
१. २६ डिसेंबर हा दिवस ‘वीर बाल दिवस’ म्हणून प्रत्येक वर्षी साजरा करण्याची घोषणा करून त्याची कार्यवाही केल्याविषयी भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करण्याचा प्रस्ताव उपसभापती नीलम गोर्हे यांनी मांडला आणि तो संमत करण्यात आला. यापुढील काळात गुरुगोविंदसिंह यांची दोन मुले साहेबजादे बाबाजोरावर सिंग आणि बाबा फतेहसिंगजी यांच्या बलीदानाचा दिवस म्हणून हा दिवस पाळला जाणार आहे. अवघ्या ६ आणि ९ वर्षांच्या या बालकांनी हिंदु धर्मासाठी त्याग केला. या संदर्भात मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी या बालकांनी कशा प्रकारे शौर्य गाजवले, याची सविस्तर माहिती सभागृहात दिली.
२. विधान परिषदेच्या काँग्रेस पक्षाच्या गटनेतेपदी डॉ. सुधीर तांबे यांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा सभापती डॉ. नीलम गोर्हे यांनी केली.