सप्तपदी
सर्व वेदवेत्या गुरुजनांना वंदन करुन आजपासून ७ दिवस विवाह संस्कारातील एक महत्त्वाचे अंग असलेल्या ‘सप्तपदी’विषयी थोडी माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत. सांप्रत काळात कौटुंबिक कलह आणि विभक्तपणा वाढलेला आहे. तसेच माझे मित्र उपेंद्र जोशीगुरुजी (सायन) यांनी आग्रह केला. या दोन्ही कारणांमुळे नवदांपत्य आणि अविवाहित यांना थोडे मार्गदर्शन व्हावे, या हेतूने ही लेखनमाला लिहीत आहे.
भाग १
१. हिंदु संस्कृतीमध्ये ४ पुरुषार्थांचे महत्त्व
विवाह हा एक महत्त्वाचा संस्कार आणि आनंद सोहळा आहे. सध्याच्या काळात यातील संस्कारांचे गांभीर्य अल्प झालेले दिसत आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे ४ पुरुषार्थ आपल्या हिंदु संस्कृतीमध्ये फार महत्त्वाचे समजले गेले आहेत. यातील पहिले ३ पुरुषार्थ हे पत्नीच्या सहकार्यानेच पूर्ण करता येतात, तर मोक्ष हा प्रत्येकाच्या उपासनेला अनुसरून प्राप्त होत असतो.
धर्म : घरात धर्मकृत्य करायचे असेल, तर पत्नीचे सहकार्य हे महत्त्वाचे असतेच.
अर्थ : आपण जे काही द्रव्य मिळवतो, त्याचे योग्य नियोजन (घरातील जिन्नस, शिक्षण, गुंतवणूक इत्यादी) हे पत्नीच्या सहकार्याने होते.
काम : सुसंस्कारीत प्रजा ही पत्नीच्याच सहकार्याने होत असते.
वधुपिता हा ‘धर्मे चार्थे च कामे च नातिचरितव्या त्वयेयम् ।’, म्हणजेच ‘धर्म, अर्थ आणि काम या तीन पुरुषार्थांत तू माझ्या कन्येचे म्हणजेच वधूचे उल्लंघन करू नये’, असे वचन मागतो. तेव्हा वर ‘नातिचरामि ।’, असे म्हणतो. म्हणजेच ‘धर्माचरणात, अर्थार्जन करण्यात आणि सर्व उपभोग घेण्यात मी हिचे म्हणजेच माझ्या पत्नीचे उल्लंघन करणार नाही’, हे मान्य करतो.
२. सप्तपदीचे महत्त्व
विवाह होम झाल्यानंतर ‘सप्तपदी’ हा महत्त्वाचा विधी आहे. (७ प्रदक्षिणा, हे दूरचित्रवाहिनींवरील मालिकांचे ‘फॅड’ आहे.) विवाह होमाला तीनच प्रदक्षिणा आहेत. होमाच्या उत्तरेला तांदुळाच्या ७ राशींवर वराने वधूला चालवावे आणि या ७ पावलांवर चालतांना ७ मंत्र म्हणावे. यालाच ‘सप्तपदी’ म्हणतात. (सप्त म्हणजे ७ आणि पदी म्हणजे पावले. याचा अर्थ वधूने ७ पावले चालणे) या ७ मंत्रांचा उत्तरार्ध हा सारखाच आहे. पूर्वार्ध मात्र भिन्न आहे आणि तो फार गांभीर्याने समजून घेतला, तर मग कौटुंबिक वाद अल्प होतील, यात शंका नाही.
३. हिंदु धर्मातील पूर्वापार चालू असलेली आश्रम व्यवस्था आजही चालू असणे
ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम हे ४ आश्रम आपल्या संस्कृतीत सांगितले आहेत. आजही ते चालू आहेत. त्याचे थोडे स्वरूप पालटले असले, तरी ते अगदीच कालबाह्य झाले नाहीत. मुंज झाली की, मुलगा (ब्रह्मचर्य) गुरुकुलात जात असे. आजही मुले ‘वेदपाठशाळेत’ किंवा छात्रालयात रहातात किंवा शिक्षणानिमित्त बाहेरगावी रहात असतात.
गृहस्थाश्रम हाही आज चालू आहे. वानप्रस्थ, म्हणजे संसारातून हळूहळू विरक्ती घेऊन आपल्या भौतिक आवश्यकता न्यून करणे आणि त्या वेळेत उपासना करणे आणि समाजाला ज्ञान कसे देता येईल, याचा विचार करणे. यालाच वानप्रस्थ म्हणतात. थोडक्यात नवृत्तीनंतरचा काळ.
संन्यासाश्रम, म्हणजे आजही सर्वसंगपरीत्याग केलेले साधूसंत संन्यस्त आहेतच. याचा अर्थ हे चारही टप्पे आजही चालू आहेत. आपणही त्याच टप्प्यातून जात आहोत. यातील ब्रह्मचारी, वानप्रस्थ आणि संन्यासी हे ३ आश्रम गृहस्थाश्रमी लोकांवर अवलंबून आहेत.
शाळेत जाणारी मुले त्यांच्या शाळेचे शुल्क, वह्या, पुस्तके, डबा इत्यादी सर्व गोष्टी आपल्या पालकांकडूनच घेत असतात. (पालक हे गृहस्थच आहेत.)
वानप्रस्थ (निवृत्तधारक) हेही त्यांच्या मुलांवर किंवा सुनांवर (गृहस्थाश्रमी) अवलंबून असतात. सर्वसंगपरीत्याग केलेले आणि भिक्षा मागणारे संन्यासी हेही अन्न अन् वस्त्र यांची याचना गृहस्थांकडेच करतात.
४. संसार करतांना तीन आश्रमांचे कर्तव्य पार पाडल्याने गृहस्थाश्रमाचे सार्थक होणे
या ४ आश्रमातील ३ जण ‘गृहस्थावर’ अवलंबून आहेत. या सर्वांना पुढे नेणे आणि त्यांना आधार देण्ो, हे गृहस्थाचेच कर्तव्य आहे. (आपणही याच स्थितीतून जाणार आहोत, हे विसरू नये.) आपण शाळेत असतांना आईवडिलांवरच (गृहस्थावरच) अवलंबून होतो. निवृत्तीनंतर मुले आणि सुना यांवर अवलंबून असू. (गृहस्थांवरच) तेव्हा संसार हा केवळ राजाराणीचाच असेल, या सांगण्याकडे दुर्लक्ष करा. या सर्वांना सहकार्य करून संसार होतो. (गृहस्थाश्रम सार्थक होतो.) त्यामुळेच ‘धन्यो गृहस्थाश्रम: ।’ म्हणजे ‘गृहस्थाश्रम धन्य आहे’, असे स्मृतिकारांनी म्हटले आहे. उगाच नको त्या ‘स्पेस’च्या नादात आणि व्यक्तीस्वातंत्र्याच्या खोट्या कल्पनांमध्ये आपले कुटुंब, वडिलधारे आणि स्वतःची मुलेबाळे यांना क्लेश देऊ नका. शास्त्रकारांनी या सप्तपदीच्या ७ मंत्रात जीवनाचे सार सांगितले आहे. ते समजून घ्या आणि त्यानुसार आचरण करा. मग आनंद कशात आहे, ते स्वत:लाच कळेल.
दांपत्यांवर समाज, सुप्रजा आणि सुसंस्कार यांचे दायित्व आहे. शाळेतील मुले (ब्रह्मचर्य) निवृत्तीनंतरचे ज्येष्ठ नागरिक (वानप्रस्थ) आणि सर्वसंगपरीत्याग केलेले संन्यासी, याचक या सर्वांचे दायित्व दांपत्यांचे आहे. हे दायित्व सोडू नये. यातून पळवाट काढू नये, ही विनंती. ‘जे पेरले तेच उगवते’, हा निसर्गनियम आहे.
५. अन्नदात्री होऊन इतरांमध्ये अन्न वाटून खाणे, ही हिंदु संस्कृती असणे
‘ॐ इष एकपदी भव । ’ म्हणजे ‘हे वधू, अन्नासाठी तू माझ्यासोबत एक पाऊल टाक’, असा पहिला मंत्र आहे. त्याचा अर्थ ‘हे वधू, तू माझे समागमे एक पाऊल चाललीस, तेव्हा तुझे-माझे सख्य झाले आहे. तू मला ‘अन्नदात्री’ हो. माझे व्रत पूर्ण करण्यास साहाय्य कर. आपणाला पुष्कळ मुले होऊन ते दीर्घायु होवोत.’ यात पत्नीकडे ‘अन्नदात्री’ हो, अशी कामना केली आहे. ‘एखाद्याच्या मनात जायचा मार्ग, हा पोटातूनच जातो’, अशी एक म्हण आहे. अन्नसंस्कार हा फार महत्त्वाचा आहे. सात्त्विक भावनेने शिजवलेले अन्न हे एक वेगळीच अनुभूती देते. अन्नापासून शरिराला पोषक द्रव्ये मिळतात, तसेच अन्न हे मन, बुद्धी आणि विचार यांवर कार्य करते. त्यामुळे अन्नशुद्धी ही गोष्ट फार महत्त्वाची आहे आणि पत्नीवर हे दायित्व आहे की, तू अन्नदात्री हो. अन्नदात्री ही केवळ पतीसाठीच असते, असा अर्थ घेऊ नये, तर ‘पोष्यवर्गाला’ (पोषण) अन्न देणे, हे आपलेच दायित्व आहे. माता, पिता, गुरु, भार्या, प्रजा, दीन, दु:खी, आश्रित, अतिथी, विकलांग, अनाथ, शरणागत, धनहीन हे सर्व पोष्यवर्गात येतात. आपण भाजीभाकरी, वरणभात असे जे काही अन्न शिजवू, त्यातील एक भाग यांच्यासाठीही बाजूला ठेवू, त्यांनाही देऊ, म्हणजेच त्यांचे पालन करण्याचे कर्तव्य पार पडेल आणि त्यांचे आशीर्वादही आपल्याला मिळतील. ‘एक घास चार जणांनी वाटून खाणे’, ही आपली संस्कृती आहे.
जीवत्येक: स लोकेषु बहुभिर्योऽनुजीव्यते ।
जीवन्तोऽपि मृताश्चान्ये पुरुषा स्वोदरम्भरा: ।।
– दक्षस्मृति, अध्याय २, श्लोक ४०
अर्थ : जो पुरुष या लोकात अनेक जणांच्या उपजीविकेचे साधन बनतो, तोच योग्य प्रकारे जीवन जगतो. अन्य लोक जे केवळ स्वतःच्या उदरभरणासाठी जगतात, ते मृतच जाणावेत.
किती उदात्त विचार आहेत !
समाजाविषयी विचार करायला ऋषिमुनींनीच आपल्याला शिकवले आहे. त्याकडे आपण दुर्लक्ष करतो. एखाद्या गरीब, अनाथ, दीन अपंगाला (पोष्यवर्गाला) अन्न दिल्यानंतर त्यांच्या तोंडवळ्यावर एक वेगळाच आनंद दिसतो. तो आपण अनुभवा. एखाद्या गायीला गोग्रास, कावळा, चिमणी, पक्षी यांना दाणे घालून पहा. त्या मुक्या प्राण्यांना किती आनंद होतो, तो अनुभवला की, सप्तपदीचे पहिले पाऊल सार्थकी लागेल. (नोकरी आणि आजारपण यांमुळे प्रतिदिन अन्नदान शक्य न झाल्यास सुटीच्या दिवशी तरी करावे.)
– वेदमूर्ती भूषण दिगंबर जोशी, वेंगुर्ले, सिंधुदुर्ग. (६.११.२०२२)